वारजेतील खवळे टोळीविरूद्ध मोक्का कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरातील कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी सराईत टोळ्यांविरूद्ध मोक्का अस्त्राद्वारे कारवाईचा बडगा कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे टोळ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत अक्षय रविंद्र खवळे टोळीविरूद्ध पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्कानुसार कारवाई केली आहे. आतापर्यंत 70 टोळ्यातील 510 हून अधिक सराईतांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.

अक्षय रविंद्र खवळे (वय 23) वारजे, तुषार ऊर्फ एस्प्या लक्ष्मण शिंदे (वय 21) राजू महादेव मारण, सचिन कैलास हिरेमणी, निलेश विजय गायकवाड (सर्व रा. वारजे), अभिजीत उर्फ सिध्दराम रमेश मंजिली (रा. लक्ष्मीनगर, कोथरूड), नंदु आनंता जाधव (वय 24), अक्षय उर्फ टिल्या गायकवाड अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत.

टोळीप्रमुख अक्षय खवळे याने साथीदारांसह वारजे परिसरात खून करणे, खुनाचा प्रयत्न, अपहरण, जबरी दुखापत करून दरोडा, दंगा, गंभीर दुखापत, मारामारी करणे अशा स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. त्यांच्याविरूद्ध मोक्का कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके यांनी पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्याकडे सादर केला.

त्यानंतर अपर आयुक्त राजेंद्र डहाळे यांनी त्यास मंजुरी दिली. ही कामगिरी आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे, अपर आयुक्त राजेंद्र डहाळे साहेब, उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, एसीपी रुक्मिणी गलंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके, पोलीस निरीक्षक अमृत मराठे, उपनिरीक्षक नरेन मुंढे सचिन कुदळे, अमोल भिसे, गोविंद फड, अमोल काटकर, अमोल राऊत, ज्ञानेश्वर गुजर, नितीन कातुर्डे, रमेश चव्हाण, गोविंद कपाटे, अजय कामठे, विजय भुरुक, प्रियांका कोल्हे यांनी केली.

नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईतांसह टोळ्यांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यावर भर देण्यात आला असून कारवाईचा वेग वाढविण्यात आला आहे. आतापर्यंत मोक्कातंर्गत 70 टोळ्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
– अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त