बगदादीच्या बहिणीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘ईसिस’चा म्होरक्या अबु बकर बगदादी याचा खात्मा केल्यानंतर अमेरिकन गुप्तचर यंत्रणेची नजर त्याच्या कुटुंबावर आहे. याचपार्श्वभूमीवर बगदादीची बहीण रशमिया अवद हिला उत्तर सिरियातून अटक करण्यात आली आहे. अजाज शहरात छापेमारी दरम्यान रशमिया एका कंटेनरमध्ये लपली होती. पण तुर्की सैनिकांनी तिला शोधून काढले.

रशमिया ही बगदादीच्या जवळ असल्याने तिच्याकडून ईसिसबदद्ल अजून काही महत्नपूर्ण माहिती मिळेल अशी शक्यता अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. रॉयटरनेही याबद्दल वृत्त दिले आहे. त्यानुसार रशमियाबरोबरच तिच्या पती व सुनेलाही अमेरिकन सैनिकांनी अटक केली आहे. तुर्की गुप्तचर यंत्रणा रशमियाची कसुन चौकशी करत आहेत.

याआधी 27  ऑक्टोबरला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ईसिसचा म्होरक्या अबु बकर अल बगदादीचा खात्मा केल्याचा दावा केला होता. इडलिब येथे अमेरिकेच्या डेल्टा फोर्सने बगदादीला ठार केले असे ट्रम्प यांनी जाहीर केले होते. या ऑपरेशनवेळी बगदादी घरात होता. ज्यावेळी अमेरिकन सैन्याने त्याच्या घरावर हल्ला केला त्यावेळी आपल्या तीन मुलांसह बगदादीने एका भुयारातून पळ काढला. मात्र अमेरिकेचे सैन्य आणि त्यांच्या कुत्र्यांपासून बचाव करताना बगदादीची पुरती दमछाक झाली. अखेर आपण चारही बाजूंनी वेढलो गेलो आहोत हे लक्षात येताच बगदादीने स्वत:ला बॉम्बने उडवले.