
अनेकांना पॉर्न व्हिडीओ बघायची सवय असते. काही जण ऑनलाईन पद्धतीनेही अशा प्रकारचे व्हिडीओ पाहतात. पण, ही सवय तुमचं गंभीर आर्थिक नुकसान करू शकते, असा इशारा सायबर तज्ज्ञांनी दिला आहे.
कोरोना महामारीपूर्वी अनेक व्यवहार ऑनलाईन पद्धतीने होत असले तरी महामारीदरम्यान त्याचा वापर जास्त वाढला. त्यामुळे अर्थातच ऑनलाईन फसवणुकीचे मार्ग आणि प्रमाण देखील वाढलं. काही नवीन पद्धतींसोबत जुन्या पद्धतीनेही ऑनलाईन फसवणूक केली जात आहे. यात प्रामुख्याने पॉर्न व्हिडीओ पाहणाऱ्यांचा समावेश होत आहे. जे लोक स्वतःच्या कॉम्प्युटरवर पॉर्न व्हिडीओ पाहतात, त्यांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सध्या एका विशिष्ट पद्धतीने पॉर्न पाहणाऱ्यांकडून पैसे उकळले जात आहेत. जो माणूस पॉर्न वेबसाईट उघडतो, त्याला समोर एका पॉप अप विंडो दिसते. त्यावर एक इशारा दिलेला असतो. तुमचा कॉम्प्युटर ब्राऊझर लॉक झाला आहे. तुम्ही हिंदुस्थानी कायद्यात नमूद केलेल्या निषिद्ध आशयाला पाहत होतात. त्यामुळे ही कारवाई विधि आणि न्याय मंत्रालयाच्या कायद्यांतर्गत केली गेली आहे. जर तुम्हाला हा ब्राऊझर पुन्हा सुरू करायचा असेल तर त्यासाठी 29 हजार रुपये भरावे लागतील, असा एक संदेश त्या इशाऱ्यात असतो.
जर तुम्ही हे पैसे पुढील सहा तासात भरले नाहीत तर तुम्ही पाहत असलेल्या आशयाची नोंद संबंधित मंत्रालयाकडे केली जाईल आणि तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. पैसे भरल्यानंतर लगेचच बाऊझर अनलॉक होईल, असंही त्यात नमूद असतं. पैसे भरण्यासाठी ऑनलाईन व्यवहारांचा पर्याय समोर दिलेला असतो.
हा संदेश अर्थातच खोटा असतो. विधी आणि न्याय मंत्रालयाच्या नावाखाली सांगितल्याने घाबरून अशा व्यक्ती पैसे भरून टाकतात. जरी हिंदुस्थानात पॉर्नोग्राफीला मनाई असली तरी सरकार कुणाच्याही कॉम्प्युटरच्या ब्राऊझर हिस्टरीवर पाळत ठेवत नाही. तेव्हा अशा प्रकारच्या फसव्या मेसेजला भुलू नये. जर ब्राउझर लॉक झाल्याचा मेसेज आला तर दोन पर्याय आहेत. एक, तुम्ही सरळ ब्राऊझर विंडो बंद करू शकता, दोन कंट्रोल+अल्ट+डीलिट वापरून तुम्ही टास्क मॅनेजमध्ये टास्क एन्ड करू शकता. वरील दोन पर्यायांनी काम झालं नाही तर सरळ तुमचा कॉम्प्युटर फोर्स शट डाऊन करू शकता, असा उपायही तज्ज्ञांनी दिला आहे.




























































