लातूर शहरात आता दहा दिवसानंतर एक वेळ पाणीपुरवठा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर आणि पाणीटंचाई हे समीकरण लातूरकरांची पाठ सोडण्यास तयार नाही. लातूर शहरात पाणीपुरवठा होणाऱ्या धनेगाव धरणात असणारा पाणीसाठा कमी असल्याच्या कारणावरून आता लातूर शहरास महिन्यातून तीन वेळा पाणीपुरवठा केला जाणार आहे. कोरोनाच्या संकटात लातूरच्या नागरिकांना आता पाणीटंचाईच्या संकटाचा सामना करावा लागणार आहे.

लातूरकरांना रेल्वेने पाणी पुरवठा करावा लागला होता. लातूरचा पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. मात्र याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा आरोप लातूरकरांचा आहे. लातुरात यापूर्वी सात दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत होता. कधी पाईपलाईन बिघाड, तर कधी मोटर बिघाड या कारणामुळे हा पाणीपुरवठा दहा ते पंधरा दिवसांपर्यंत जात असे. आता धरणातील पाणी पुरवठा कमी झाल्याच्या कारणावरून महानगरपालिकेने  दहा दिवसाला एक वेळा पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. 5 मे नंतर लातूर शहरात सर्वत्र 10 दिवसाला एक वेळ पाणीपुरवठा होणार आहे.