महाराष्ट्राच्या घशाला कोरड! धरणांमध्ये 20 टक्के पाणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

महाराष्ट्रात सध्या लोकसभा निवडणुकीचा माहोल असला तरी दुसरीकडे राज्याच्या ग्रामीण भागात पाण्याचा साठा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. आजच्या घडीला महाराष्ट्रातल्या धरणांमध्ये केवळ 20.28 टक्के जलसाठा शिल्लक आहे. महाराष्ट्रातल्या अनेक जिह्यांमध्ये दर आठवडय़ाला दोनशे टँकरची मागणी वाढत आहे. मे महिन्यात पाण्याची मागणी वाढतच जाणार आहे. राज्यात मे 2016 सारखी भीषण पाणीटंचाई होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

मागील वर्षी अपुरा पाऊस झाल्यामुळे राज्यातल्या 151 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे तर 5 हजार 500 गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. राज्यातल्या अनेक भागांमध्ये विहिरी कोरडय़ा पडल्या असून टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. आजच्या घडीला राज्यात सुमारे 4 हजार 594 टँकरनी वाडय़ावस्त्यांवर पाणीपुरवठा केला जात आहे. राज्यात सध्या अतिशय भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. खासकरून मराठवाडय़ाला मोठा फटका बसला आहे. मराठवाडय़ात सध्या 2 हजार 470 टँकरनी वाडय़ावस्त्यांची तहान भागवली जात आहे. मागील वर्षीच्या तुलनेत मराठवाडय़ात पाण्याची परिस्थिती अतिशय भीषण आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्यात फक्त 784 टँकरनी पाणीपुरवठा केला जात होता. यंदा मराठवाडय़ात टँकरची संख्या पाच पटीने वाढली आहे.

रेल्वे वाघिणींतून पाणीपुरवठा
मे 2016 मध्ये राज्याच्या अनेक भागांत अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्या वर्षी मिरजहून लातूरला रेल्वेच्या वाघिणींमधून पाणीपुरवठा करण्यात आला होता, अशी आठवण या अधिकाऱ्याने सांगितली.

वीस टक्के पाणीसाठा
राज्यातल्या धरणांमध्ये केवळ आजच्या दिवशी केवळ 20.28 टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे तर 82.73 टक्के मृत जलसाठा आहे. वास्तविक मृत जलसाठा 100 टक्के शिल्लक असणे आवश्यक आहे, पण त्याची पातळीही घटली आहे.

मृत जलसाठा म्हणजे काय?
धरणाच्या तळाशी असलेला पाण्याचा साठा गुरुत्वाकर्षणशक्तीने पुढे जात नाही. पंप लावून हा पाणीसाठा उपसावा लागतो. सुरक्षित जलसाठा म्हणून हा जलसाठा ओळखला जातो. शक्यतो या पाणीसाठय़ाला हात लावला जात नाही.

ठाणे-पालघरलाही टँकर
मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला पाणीटंचाईचा फटका बसला आहेच, पण मुंबईलगतच्या ठाणे व पालघर जिह्यातील अनेक वाडय़ावस्त्यांची तहान टँकरच्या पाण्यावर भागवावी लागत आहे. सध्या ठाण्याला 24 टँकर तर पालघरमध्ये 30 टँकरनी पाणीपुरवठा करावा लागत आहे.

मे महिन्यात तीव्रता वाढणार
मे 2016 मध्ये महिन्याला राज्यात सुमारे सहा हजार टँकरनी पाणीपुरवठा सुरू होता. या वर्षी एप्रिल महिन्यात 4 हजार 594 टँकरच्या सहाय्याने राज्यातल्या वाडय़ावस्त्यांवरची पाण्याची तहान भागवली जात आहे. सध्या दर आठवडय़ाला राज्यात सरासरी 200 टँकर्सची मागणी वाढत आहे. त्यामुळे मे-जून महिन्याच्या अखेरपर्यंत दोन वर्षांपूर्वी जशी पाण्याची टंचाई निर्माण झाली होती तशीच परिस्थिती यंदा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती राज्याच्या मदत व पुनर्वसन खात्यातील एक ज्येष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली.

पाणी टँकरची सध्याची संख्या
संभाजीनगर 980
जालना 446
बीड 747
परभणी 42
हिंगोली 34
नांदेड 73
धाराशीव 110
लातूर 38
नाशिक 238
जळगाव 130
नगर 730
पुणे 131
सातारा 189
सांगली 176
सोलापूर 205
ठाणे 24
रायगड 18
पालघर 30