अहमदपूर- नगर पालिकेच्या नियोजनाअभावी महिन्यातून एकदा नळाला पाणी

सामना प्रतिनिधी, अहमदपूर

पाणी पुरवठा करण्यासाठी थोडगा, नांदुरा व लिंबोटी धरणातून जलवाहिनी अंथरून पुरवठा करण्यात येत आहे. परंतु यावर्षी अल्प पाऊस झाल्याने थोडगा आणि नांदुरा तलावातून पाणी पुरवठा पूर्णतः बंद आहे. सद्यस्थितीत लिंबोटी धरणातून शहरास पाणी पुरवठा करण्यासाठी मुबलक पाणी साठा आहे. परंतु नगर पालिकेच्या नियोजनाअभावी शहरातील जनतेला महिन्यातून एक वेळेस नळाला पाणी सोडले जाते. त्यामुळे येथील नागरिक पाण्यासाठी त्रस्त असून, नगर पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सुस्त आहेत. याचा त्रास विनाकारण जनतेला सहन करावा लागत आहे.

अहमदपूर शहराला शिक्षणाची पंढरी म्हणून संबोधले जाते. त्यामुळे येथे बाहेरगावाहून हजारो मुले शिक्षणासाठी येतात. या शैक्षणिक वातावरणामुळे अनेक पालक रूम करून वास्तव्यास राहतात. येथे खाजगी वसतीगृहाची सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने निवासी वस्तीगृहात आपल्या पाल्यांना प्रवेश देऊन शिक्षण देतात. तालूक्यातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी व इतर खात्यातील कर्मचाऱ्यांनी या शहरात शिक्षण उत्तम दर्जाचे मिळते. या कारणाने निवासाची व्यवस्था करून भाडेतत्त्वावर रूम घेऊन वास्तव्यास राहतात. त्यामुळे या शहरात नेहमीच रहदारीचे प्रमाण जास्त आहे. परंतु थोडगा व नांदुरा तलावात शून्य पाणी साठा उपलब्ध असल्याने त्यातून पाणी पुरवठा पूर्णतः बंद आहे. लिंबोटी धरणात या शहराची तहान भागवण्यासाठी पाणी उपलब्ध आहे. परंतु येथील नगरपालिकेच्या नियोजनाअभावी अहमदपूरकरांची तहान भागत नाही. परिणामी येथील नागरिकांना महिन्यातून एकदा न.प. द्वारे नळाला पाणी मिळत असल्याने अवाजवी पैशाचा खर्च करून खाजगी टँकर्सवाल्याकडून पाणी विकत घेऊन आपली तहान भागवावी लागत आहे. शहरात खाजगी टँकर्सची संख्या जवळपास 80 ते 90 आहे.

एक हजार लिटरचे खासगी टँकर अडीचशे रुपयांना तर पाच हजार लिटरचे टँकर्स एक हजार रुपयांना खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे खाजगी पाणी विक्रेत्यांचा धंदा तेजीत असून तेही पाणी लवकर मिळत नाही. यासाठी पाच ते सहा तास वाट पाहावी लागत असल्याने येथील नागरिक पाण्यासाठी त्रस्त आहेत. प्रशासन व लोकप्रतिनिधी प्रचारात गुंतल्याने व आचारसंहितेच्या नावाखाली वेळ घालत असल्याने आज तरी नागरिकांना प्रत्येक कॉलनीत घागरभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. परंतु कॉलनीतील 80 टक्के बोअरवेल पाण्यावाचून बंद पडल्याने रिकाम्या हाती परतावे लागत आहे. ही वेळ येथील नागरिकावर आली असताना सुद्धा शहरात एकही टँकर शासनाने किंवा नगर पालिका प्रशासनाने चालू केला नसल्याचे दिसून येत आहे. तसेच काही प्रभागात नगरपालिकेने नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी खोदकाम केले पाईप अंथरले. परंतु दोन महिन्यापासून अद्याप पर्यंत एकाही नळ कनेक्शन न दिल्यामुळे येथील जनतेवर खाजगी टँकर्सद्वारे पाणी विकत घेण्याची वेळ आलेली आहे. या नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे येथील नागरिक मेटाकुटीला आले आहेत.

अहमदपूर तालूक्यातील जवळपास 60 गावासह वाडी- तांड्यावर पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. तालूक्यातील नऊ गावांनी प्रशासनाकडे टँकरची मागणी केली असून आज तारखेला फक्त परचंडा येथे टँकर्सने पाणी पुरवठा केला जात आहे. उर्वरित गावातील नागरिकांना आजही पाण्यासाठी रात्रीचा दिवस करून भटकंती करावी लागत आहे. तसेच पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागणाऱ्या तालुक्यातील साठ गावासह वाडीत तांड्यातून जवळपास 89 शेतकऱ्यांच्या बोअर व विहिरीवर अधिग्रहण करून तात्पुरता पाणी प्रश्न सोडवला जात आहे. परंतु अल्प पर्जन्यमानामुळे बरेच बोअरचे व विहिरीचे पाणी पातळी खोलवर गेल्याने या गावांना भीषण पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत.