
सामना प्रतिनिधी, मुरबाड
शहापूर-खोपोली महामार्गाच्या भरावासाठी मुरबाडच्या डोंगरांमध्ये केलेल्या शक्तिशाली स्फोटांनी कोळठाण गावातील शंभर घरांना तडे गेल्याची घटना ताजी असतानाच आता या गावातील विहिरी आणि बोअरवेलचे पाणीही गायब झाले आहे. बेकायदा स्फोटांच्या तडाख्याने पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांनाच हादरे बसल्याने झरे आटल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला असून आधीच पाणीटंचाईने मेटाकुटीस आलेल्या कोळठाणवासीयांना हंडाभर पाण्यासाठी आता वणवण करावी लागत आहे. दरम्यान स्फोटांमुळे झोपड्या कोसळल्याने अनेक आदिवासी कुटुंबांना आपल्या कच्च्याबच्च्यांना घेऊन रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे.
शहापूर-मुरबाडमार्गे खोपोली या महामार्गाचे काम नीलेश सांबरे यांच्या जिजाऊ कन्स्ट्रक्शन पंपनीला देण्यात आले आहे. कोळठाण गावातील स्टोन क्रशर व खदानीमधून खडी रस्त्यासाठी वापरली जाते. गावालगत असलेल्या या खदानीवर दगड फोडण्यासाठी उच्चदाबाचे ब्लास्ंटिग केल्याने जमीन हादरून पंधराशे लोकवस्ती असलेल्या या गावातील शंभरच्या वर घरांना तडे गेले आहेत. मंदिराला देखील तडे गेले असून आदिवासींच्या झोपडय़ा कोसळल्या आहेत. यासोबत गावातील पाण्यावर दोन दिवही व अनेक बोअरिंग आटल्याने गावांवर संकटच कोसळले आहे. यास जबाबदार असणाऱ्या खदान व क्रशर नीलेश सांबरेच्या मालकीची असून ती विनापरवाना असल्याचे समोर आले आहे.
आता आम्ही राहायचे कुठे?
ब्लास्टिंगमुळे आमची घरे कोसळली. मात्र सरकारी अधिकारी साधे पंचनामे करण्यात चालढकलपणा करीत असल्याने नुकसानभरपाई मिळण्यात अडचणी निर्माण होणार आहे. अशा परिस्थितीत आम्ही राहायचे कुठे? असा सवाल शांताबाई मुकणे यांनी केला आहे. क्रशर मालकावर तत्काळ कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करू असा इशारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तुकाराम ठाकरे यांनी दिली आहे तर मंडळ अधिकारी दत्तात्रय मोरे यांनी आतापर्यंत 80 घरांचे पंचनामे झाले असून संपूर्ण चौकशीनंतर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.




























































