मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठ्यात दोन दिवसात वाढ

1018

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्राला अव्याहतपणे व सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्यातील कामगार – कर्मचारी – अभियंता – अधिकारी दिवसरात्र सातत्याने कार्यरत आहेत. मुंबईला ज्या सात तलावांमधून पाणी पुरवठा करण्यात येतो, तिथे हे कामगार – कर्मचारी – अधिकारी सध्याच्या कोरोना काळातही कर्तव्य बजावित आहेत. गेल्या दोन दिवसात मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांच्या परिसरात चांगला पाऊस झाल्याने तलावांच्या एकूण पाणीसाठ्यामध्ये 51 हजार 685 दशलक्ष लीटर अर्थात 5 हजार 168 कोटी लीटरची भर पडली आहे. या तलाव साठ्यातून मुंबईला दररोज सरासरी 3 हजार 850 दशलक्ष लीटर (385 कोटी लीटर) एवढा पाणीपुरवठा करण्यात येतो. ही बाब लक्षात घेतल्यास गेल्या 2 दिवसात सुमारे 13 दिवसांच्या पाणी साठ्याची भर पडली आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणारे सात तलाव असून यापैकी 5 तलाव बृहन्मुंबई महापालिकेचे आहेत, तर 2 तलाव राज्यशासनाच्या अखत्यारितील आहेत. या तलावांची पाणी पातळी रोज सकाळी 6 वाजता मोजली व नोंदविली जाते. यानुसार 4 जुलै 2020 रोजी 7 तलावातील एकूण पाणीसाठा 1 लाख 9 हजार 7 दशलक्ष लीटर एवढा होता. तर 6 जुलै 2020 रोजी हा पाणीसाठा 1 लाख 60 हजार 692 दशलक्ष लीटर एवढा झाला आहे. दोन दिवसात झालेल्या पावसामुळे तलावांच्या पाणीसाठ्यात 51 हजार 685 दशलक्ष लीटर एवढी वाढ झाली आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 38 हजार 208 दशलक्ष लीटरची वाढ ही ‘भातसा’ मध्ये, तर या खालोखाल 3 हजार 807 दशलक्ष लीटरची वाढ ‘विहार’ तलावात झाली आहे. यानंतर तानसा तलावात 2 हजार 221 दशलक्ष लीटर, तुळशी तलावात 2 हजार 38 दशलक्ष लीटर आणि मध्य वैतरणा 1 हजार 930 दशलक्ष लीटरची वाढ झाली आहे. तर अप्पर वैतरणा तलावातील जलसाठ्यात कोणतीही वाढ नोंदिवण्यात आलेली नाही.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांच्या साठ्यात वाढ झाली असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा अद्यापही कमी आहे. गेल्या वर्षी आजच्याच दिवशी म्हणजेच सातही तलावांचा एकूण पाणीसाठा 2 लाख 16 हजार 522 दशलक्ष लीटर एवढा होता, जो यंदाच्या तुलनेत 55 हजार 830 दशलक्ष लीटरने अधिक होता. तर त्याआधीच्या वर्षी म्हणजेच 3 लाख 55 हजार 360 दशलक्ष लीटर एवढा होता, जो यंदाच्या पाणीसाठ्यापेक्षा दुपटीनेही अधिक होता. गेल्यावर्षी 12 जुलै 2019 रोजी तुळशी तलाव हा पूर्ण भरुन वाहू लागला होता. त्यानंतर 25 जुलै 2019 रोजी तानसा, 26 जुलै 2019 रोजी मोडक सागर, 31 जुलै 2019 रोजी विहार, 25 ऑगस्ट 2019 रोजी मध्य वैतरणा आणि 31 ऑगस्ट 2019 रोजी अप्पर वैतरणा तलाव भरुन वाहू लागले होते.

आपली प्रतिक्रिया द्या