पावसाने दुसऱ्या दिवशीही लोकल सेवा विस्कळीत, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्य़ांचे हाल

250

मुंबई आणि उपनगरात कोसळलेल्या तुफान पावसाने उपनगरीय लोकल सेवा पुरती गारठली. मध्य रेल्वेची वाहतूक दुपारनंतर सीएसएमटी ते वाशी आणि कुर्ला अशी ठप्प झाली. पश्चिम रेल्वेच्या लोकलही सोसाट्याचे वाऱ्य़ाने ट्रकवर झाडे कोसळल्याने चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान दुपारी चारनंतर बंद करण्यात आली. मध्य आणि पश्चिम मार्गावर अत्यावश्यक कर्मचाऱ्य़ांसाठी प्रत्येकी साडे तीनशे फेऱ्य़ा चालविण्यात येतात. गाड्या बंद पडल्याने कामावरून घरी जाणाऱ्य़ा अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्य़ांचे प्रचंड हाल झाले.

विरार ते डहाणू भागात पाणी भरल्याने सकाळी काही काळ बंद असलेली पश्चिम रेल्वेची सेवा दुपारपर्यंत कशीबशी सुरू होती. परंतू संध्याकाळी चारच्या सुमारास झालेल्या वादळी पावसाने मरीनलाइन्स आणि चर्नीरोड दरम्यान झाडे आणि झाडांच्या फांद्या उन्मळून ट्रकवर पडल्याने चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान ठप्प झाली. मध्य रेल्वेच्या मस्जिद ते सँडहर्स्ट रोड स्थानकांदरम्यान पाणी साचल्याने हार्बर मार्ग तर कुर्ला येथे पाणी साचल्याने सीएसएमटी ते कुर्ला वाहतूक ठप्प झाली.  

चर्नी रोड येथे ओव्हरहेड वायरवर झाड कोसळले

पश्चिम रेल्वेची वाहतूक सकाळी विरार ते डहाणू ठप्प होती. त्यानंतर चर्चगेट ते डहाणू वाहतूक दुपारपर्यंत सुरू होती. परंतु सायंकाळी झाड ओव्हरहेड वायरवर कोसळल्याने मुंबई सेंट्रल ते चर्चगेट सेवा अखेर बंद करण्यात आली.  

बेस्टच्या 33 गाड्यात बिघाड

दहीसर सबवे, हिंदमाता सिनेमा, वडाळा स्टेशन, गांधी मार्केट किंग्जसर्कल, गायमुख, घोड बंदर रोड आणि काशीमीरा येथे पाणी साचल्याने बेस्टचे 30हून अधिक मार्ग वळविण्यात आले. बेस्टच्या 33 हून अधिक गाड्या रस्त्यांवर बंद पडल्या.

आरपीएफ जवानांनी लोकलमध्ये  अडकलेल्या 290 प्रवाशांची सुटका केली

मुसळधार पावसाने मध्य रेल्वेच्या मस्जिद आणि स्टँडहर्स्ट रोड दरम्यान रुळांवर दोन ते फुटांपर्यंत पाणी आल्याने दोन लोकलमध्ये अडकलेल्या 290 प्रवाशांची मध्य रेल्वेच्या जवानांनी बुधवारी रात्री सुखरूपपणे सुटका केली.

कोसळत असलेल्या पावसाने दुपारी सोसाट्याच्या वादळीवाऱ्य़ासह हजेरी लावल्याने सॅँडहर्स्ट रोड आणि मस्जिद दरम्यान रूळांवर दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी भरले. संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान सीएसएमटीहून कर्जतला निघालेल्या एका लोकलचे मस्जिद स्थानकावर अर्धे डब्बे फलाटावर तर अर्धे डबे बाहेर अशा अवस्थेत ही लोकल अडकली, त्यातील दीडशे प्रवाशांना आरपीएफ जवानांनी तातडीने बाहेर काढले. परंतु टिटवाळाहून आलेली दुसरी लोकल स्टँडहर्स्ट रोड आणि मस्जिदच्या दरम्यान अडकून पडल्याने त्यातील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या टीमलाही पाचारण करण्यात आले. परंतू प्रत्यक्षात ही टीम पोहोचण्याआधीच आरपीएफने त्यात अडकलेल्या चाळीस ते पन्नास प्रवाशांची सुखरूप सुटका केली. सीएसएमटी आरपीएफच्या इन्स्पेक्टर संदीप खिरीटकर यांच्या टीमने दोन ते फूट पाण्यात उतरून सर्व प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढले.

पालिका शाळांमध्ये  अडकलेल्यांची व्यवस्था

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर, लोकल आणि इतर वाहतूक विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर, रेल्वे स्थानक किंवा अन्य ठिकाणी अडकून पडलेल्या लोकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात थांबण्याची व्यवस्था रेल्वे स्थानकांजवळच्या पालिका शाळांमध्ये करण्यात आली आहे, अशी माहिती पालिकेच्या जनसंपर्क विभागाने दिली आहे.

भांडुपमध्ये गॅलरी  कोसळून दोघे जखमी

भांडुप पश्चिमधील अंजना इस्टेट चाळीतील एकमजली घराची गॅलरी आज सकाळी पावणेअकराच्या सुमाराला कोसळली. यात घरात अडकलेले दोघे जण किरकोळ जखमी झाले. अजय अगरवाल (48) आणि कांती अगरवाल (66) अशी त्यांची नावे आहेत. घटनेनंतर त्यांच्यावर एम. टी. अगरवाल रुग्णालयात उपचार करून घरी पाठवण्यात आले आहे, अशी माहिती पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.  

झाडांची पडझड, गाडय़ांचे नुकसान; जसलोक रुग्णालयाचे पत्रे उडाले

मुंबईत भायखळा येथे अरिहंत सोसायटीजवळ मोठे झाडे मुळासकट उन्मळून पडले. परळ येथे केईएम रुग्णालयाजवळ भले मोठे झाड बस स्टॉपवर कोसळले. यात दोन बसचे मोठे नुकसान झाले. मंत्रालय गेट गार्डन येथे झाड कोसळल्याने गाडय़ांचे मोठे नुकसान झाले. मरीन लाईन्स येथे सिग्नल यंत्रणेच्या खांबावर विजेचा खांब कोसळला. यात कोणी जखमी झाले. जसलोक रुग्णालयाला बाहेरून सुरक्षेसाठी लावलेले लोखंडी पत्रे उंचावरून खाली कोसळले. सुदैवाने, यात कोणालाही इजा झाली नाही. दरम्यान, नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमचा काही भाग तसेच जेएनपीटीतील क्रेन कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या