लातूरात १० दिवसातून एकदा पाणी: जिल्ह्यात पाणी टंचाई गंभीर

सुकलेले नदीपात्र

सामना प्रतिनिधी । लातूर

लातूर शहर आणि जिल्ह्यात सध्या भीषण पाण्याची टंचाई सुरू आहे. पाणी टंचाई संदर्भात प्रशासनास गांभीर्य नाही. तहान लागली की विहीर खोदायची या उक्तीप्रमाणे प्रशासन वागत आहे. लातूर शहरात १० दिवसाला एकवेळ पाणी पुरवठा होत आहे. तर अहमदपूर शहरात ३५ दिवसानंतर पाणी पुरवठा होत आहे. प्रशासनाच्या नियोजन शुन्यतेमुळेच अधिक पाणी टंचाई जाणवत आहे.

कायम दुष्काळी जिल्हा हा डाग लागलेला लातूर जिल्हा असून पाण्याच्या टंचाईमुळे राज्यातील रेल्वेने पाणी पुरवठा करावा लागलेले एकमेव शहर म्हणूनही लातूरची ओळख झालेली आहे. लातूर शहर आणि जिल्ह्यातील पाण्याची टंचाई भीषण स्वरुप धारण करीत आहे. लातूर शहरात १० दिवसाला एकदा पाणी पुरवठा केला जात आहे. मध्येच वीजेचा प्रश्न निर्माण झाला, पाईपलाईन, व्हॉल्व खराबी या कारणामुळे पाणी पुरवठ्याचे दिवस पुढे वाढतात. लातूरात पुन्हा पाणी आणायचे कोठून हा खरा प्रश्न आहे. जिल्ह्यातील सर्व नद्या कोरड्याठाक पडलेल्या आहेत. मध्यम प्रकल्प, लघू तलाव कोरडे पडलेले आहेत. केवळ मोजक्यात कांही ठिकाणी एक टक्का उपयुक्त पाणीसाठा आहे. अहमदपूर शहरात तर ३५ दिवसानंतर पाणी पुरवठा होत आहे.

जिल्ह्यात सध्या निर्माण झालेली ही पाणी टंचाई प्रशासनाच्या नाकर्तेपणाचे प्रतिक आहे. पाऊस कमी झालेला आहे याची माहिती असताना प्रशासनाने कांहीच उपाययोजना केल्या नाहीत. उपलब्ध असणारे पाणी संपले आणि आता प्रशासन जागे होऊन मोटारी जप्तीची मोहीम राबवण्याचे नाटक सुरू केले आहे. लातूर जिल्ह्यात कुठेच चारा छावणी सुरू होऊ शकली नाही. हंडाभर पाण्यासाठी वणवण करावे लागत आहे.

शहरातील नागरिकांना पाण्यावरच अधिक पैसा खर्च करावा लागत आहे त्यामुळे सर्वांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. ग्रामिण भागातही आता पिण्यासाठी विकतच्या पाण्यावर अधिक विश्वास ठेवावा लागत आहे. जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पात, लघू तलावात उपलब्ध असणारा पाणीसाठा केवळ कागदोपत्रीच राखीव ठेवण्यात आला. त्यामुळे सध्या सर्वत्र भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

जलयुक्तच्या कामामुळे जिल्ह्यात टँकरची संख्या वाढली नाही, असे म्हणत आपली पाठ थोपटून घेण्यात प्रशासन समाधानी राहिले. प्रत्यक्षात पाण्याची समस्या गांभीर्याने घेण्यात आली नाही. जलयुक्त शिवारच्या कामाकडेही म्हणावे असे गांभीर्याने पाहिलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यात प्रशासनाच्या विरोधात तिव्र असंतोष पसरलेला आहे.