
स्टेम प्राधिकरणाकडून करण्यात येणारी जलवाहिनी मीरा रोड व चेना परिसरातील फुटल्याने मीरा-भाईंदरमध्ये सलग दोन दिवस पाणीपुरवठा खंडित झाला होता. परिणामी भर उन्हाळ्यात पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले असून शहरवासीयांना तीन दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांवर ‘पाणी पाणी’ करण्याची वेळ आली आहे. मीरा-भाईंदरला एमआयडीसी व स्टेम प्राधिकरणाकडून २११ एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येतो.
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. तसेच दिवसेंदिवस शहराची लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे करण्यात येणारा पाणीपुरवठा अपुरा पडत आहे. त्यातच शुक्रवारी मध्यरात्री स्टेम प्राधिकरणाची जलवाहिनी हटकेशजवळ फुटली. त्यानंतर तत्काळ दुरुस्तीचे काम हाती घेऊन शनिवारी काम पूर्ण केले, परंतु काम पूर्ण झाल्यानंतर काही वेळातच पुन्हा स्टेम प्राधिकरणाची जलवाहिनी चेनाजवळ अचानक फुटली. त्यामुळे स्टेमकडून शहराला केला जाणारा पाणीपुरवठा पूर्णतः बंद होता.
जलवाहिनी रविवारी दुपारी दुरुस्त करण्यात आली. यामुळे एकूणच शहराला होणारा पाणीपुरवठा ३८ तास खंडित झाला. त्यामुळे तीन दिवसांपासून अनेक भागात पाणीपुरवठा झालेला नाही. टँकरमधून दूषित पाणी नागरिकांना पाण्याच्या टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. पाण्याची मागणी वाढल्याने टँकरदेखील मिळत नाहीत तसेच टँकरच्या दरामध्येदेखील वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे भर उन्हात नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल. तसेच टँकरमधून करण्यात येणारा पाणीपुरवठादेखील दूषित आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे.



























































