पुणे तिथे पाणी उणे! पाण्याची बोंबा बोंब, वेळापत्रकाचा उडाला बोजवारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन, पुणे

ऐन दिवाळी सणाच्या तोंडावरच शहरात  रोज एक वेळ पाच तास  पाणी पुरवठा करणाऱ्या वेळापत्रकाचा पहिल्याच दिवशी बोजवारा उडाला.त्यामुळे शहरातील अनेक भागात जाहीर केलेल्या वेळेनुसार पाणी आले नाही. त्यामुळे पाण्याची बोंबा बोंब झाली असुन ‘पुणे तिथे पाणी उणे ’ असे चित्र निर्माण झाले आहे. शहराचा पाणी पुरवठा सुरळित करण्यासाठी वेळापत्रकात बदल करण्याची नामुष्की पालिका प्रशासनावर आली आहे.

शहरात कालवा फुटी आणि महापालिकेचे पाुणी पुरवठयाचे पंप बंद केल्यानंतर तक्रारींमध्ये वाढ झाली होती.  शहराच्या पाणी पुरवठ्याच्या तक्रारी लक्षात घेता. समान पाणीपुरवठा करण्यासाठी झोनमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार आता सर्व भागात रोज एक वेळ पाणी सोडण्याची   अंमलबजावणी सोमवारपासून सुरु झाली. पण या वेळापत्रकाचा पहिल्याच दिवशी बोजवारा उडाला.

हडपसर, बिबवेवाडी, पर्वतीदर्शन, मुळा रोड, गुजरात कॉलनी या भागातील  नागरिकांना जाहीर केलेल्या वेळेत पाणी मिळाले नाही.  हडपसर आणि लोहगावमध्ये चार  दिवसांपासून पाणी नाही. बिबवेवाडी मधील नागरिक सोमवारी पाणी नक्की मिळेल म्हणून वाट पहात होते. त्यांच्याकडे पाणी आलेच नाही. पर्वती दर्शन तसेच पद्दमावती या भागातील सोसायट्यांमध्ये पाणी आले मात्र त्याला काही प्रेशरच नव्हते. त्यामुळे त्यांच्या टाक्या भरल्याच नाहीत.

पाणी पुरवठयाच्या वेळा बदलल्यामुळे शहराच्या विविध भागांमधील कुटुंबांमध्ये आता त्यानुसार नियोजन करण्यात येत आहे. नेमके पाणी येण्याच्या वेळेसच घरात कोणीच नसेल अशा कुटुंबाची अडचण होत आहे. काही भागांमध्ये पाणी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार आले. शहराच्या मध्यभागातीस पेठांमध्ये त्याचे प्रमाण मोठे आहे. फक्त एकवेळ पाणी येणार असल्यामुळे आता त्यांना सकाळी आले तर संध्याकाळी नाही व संध्याकाळी मिळाले तर सकाळी नाही याची सवय करावी लागणार आहे.

पाण्याचे वेळापत्रक बदलावे लागणार 

‘संपुर्ण शहराला एकाच सोयीच्या वेळी पाणी पुरवठा करणे शक्यच नाही. त्याच्या वेळा वेगवेगळ्याच ठेवाव्या लागतात. जाहीर केलेल्या वेळेला पाणी मिळाले पाहिजे पण त्यात काही तांत्रिक अडचणी येतात. टाकीतील पाण्याची लेव्हल व त्यावरची ग्राहकसंख्या असे हे गणित आहे. सर्वात शेवटच्या भागाला पाणी मिळण्यास अडचण होते. त्यासाठी टाकी पुन्हा भरावी लागते. या तांत्रिक अडचणी आहेत. त्या लक्षात घेऊन आता काही ठिकाणी वेळापत्रकात बदल करण्यात येत आहे. १० टक्काहुन अधिक  वेळापत्रक बदलावे लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्या भागाला पाणी मिळू शकेल, असे  पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रविण गेडाम  यांनी सांगितले.

पाच तास नव्हे दोनच तास पाणी 

शहराला सलग पाच तास पाणी असे महापालिका प्रशासन व पदाधिकाड्ढयांनी जाहीर केले असले तरीही ते शक्य नसल्याचेच स्पष्ट झाले आहे. जलवाहिन्याची रचना, चढऊतारासारखी भौगौलिक समस्या व एखाद्या टाकीमधील पाण्याच्या वितरणावर त्या टाकीच्या क्षमतेपेक्षा जास्त नळजोड असणे ही कारणे त्यामागे आहे. त्यातूनच पाच तास सांगण्यात आले तरीही फार तर दोन ते तीन तास पाणी मिळाले आहे. पेठांमध्ये मात्र पाणी बराच वेळ होते. मात्र तिथे ते सायंकाळी सोडले गेले नाही.

आयुक्तांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा

शहरातील पाणी पुरवठा अदयापही विस्कळीत आहे. हडपसर भागात तर चार दिवस पाणी येत नाही. त्यामुळे आता आयुक्त सौरभ राव यांच्या घरासमोर पाण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा विरोधीपक्षनेते चेतन तुपे यांनी दिला आहे.