
भंडारदरा धरणाच्या कालवा सल्लागार समितीच्या नियोजनानुसार लाभ क्षेत्रातील उन्हाळी हंगाम शेती सिंचनासाठीचे उन्हाळ्यातील दीर्घ कालावधीचे दुसरे मोठे आवर्तन रविवारी (7 मे) सायंकाळी 6 वाजता 600 क्युसेक्सने निळवंडे धरणातून प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आले. शेती सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी हे आवर्तन सोडण्यात आले असून यामुळे प्रवरा नदीलगत परिसरातून वातावरणात दिवसागणिक वाढत असलेले उष्णतामान कमी होण्यास मदत होईल. या आवर्तनात प्रवरा नदीपात्रात नदीकाठावरील गावांतील बालगोपाळ व तरूणांईला ऐन उन्हाळ्यात नदीत पोहण्याची संधी व आनंद मिळणार आहे. दोन दिवसांतच हे आवर्तनाचा 1,400 ते 1,500 क्युसेक्स विसर्ग वाढविण्यात येईल.
रविवारी सायंकाळी 6 वाजता आवर्तन सोडण्यापूर्वी भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 6,579 दलघफू 59.60 टक्के व निळवंडे धरणाचा पाणीसाठा 4,757 दलघफू 57.12 टक्के शिल्लक होता. या आवर्तनामुळे भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रातून सिंचना अभावी सुकत असलेल्या उभ्या पिकांना जीवनदान मिळेल. तसेच नदीकाठच्या गावांतील पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होण्यास मदत होईल. या आवर्तनात सिंचनासाठी अंदाजे 2 हजार 500दलघफू पाणीवापर होईल. साधारणपणे 20 ते 25 दिवस हे आवर्तन सुरूच राहील, अशी माहिती अहमदनगर जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता जी. बी. नान्नोर व भंडारदरा धरणाचे सहाय्यक अभियंता अभिजीत देशमुख यांनी दिली.
या आवर्तनानंतर लगेचच प्रवरा नदीपात्रातील कोल्हार पासून खालील प्रवरा नदीपात्रालगतच्या गळनिंब (तालुका, नेवासे) पर्यंतच्या 14 कोल्हापूर पद्धतीच्या बंधा-यांचे पुनर्भरण करण्यात येणार आहे. मागील वर्षी या आवर्तनाला जोडूनच हे 14 कटीवेअर पुनर्भरण करण्यासाठी सुरू स्वतंत्र आवर्तनाचे पाणी या पाण्यातून सोडण्यात आले होते.



























































