आंघोळीसाठी तलावावर गेलेल्या दोन भावांना टँकरने चिरडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन ,कसारा

कसाऱयातील गावपाडय़ांवर सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. कसारापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या पेठय़ाचा पाडय़ावर सुमारे पाचशे कुटुंबांची वस्ती आहे. हंडाभर पाण्यासाठी येथील माता-भगिनींना मैलोन्मैल पायपीट करावी लागते. पेठय़ाच्या पाडय़ावर रोज पाण्याचा फक्त एकच टँकर येत असून प्रत्येकाला जेमतेम दोन हंडे दिले जातात. मात्र हे पाणी पुरत नाही. धुणी-भांडी करायला तसेच आंघोळीलाही पाणी नाही. त्यामुळे येथील पुरुष मंडळी तसेच लहान मुलेही दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या करंजपाडा येथील तलावात महामार्ग ओलांडून आंघोळीसाठी जातात.

आज सकाळी पेठय़ाच्या पाडावरील पप्पू धापटे व जयराम धापटे हे दोन चुलत भाऊ बाईकने आंघोळीसाठी तलावावर गेले होते. आंघोळ उरकून शिरोळ फाटय़ामार्गे घराकडे जात असताना मुंबईहून नाशिककडे जाणाऱया टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिली. काही क्षणातच दोघे भाऊ रस्त्यावर फेकले गेले. त्याचवेळी पाठीमागून येणाऱया एका अज्ञात ट्रकने पप्पू व जयराम या दोघांना पुन्हा जोरदार धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान हा पाणीटंचाईचाच बळी असून पोलिसांनी टँकरचालकाला अटक केली आहे.

नातेवाईकांचा आक्रोश

जयराम व पप्पू यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजताच पेठय़ाच्या पाडय़ावरील नातेवाईकांनी तसेच गावकऱयांनी महामार्गाकडे धाव घेतली. नातेवाईकांच्या आक्रोशाने तर अनेकांचे काळीज पिळवटून गेले. पाणी नसल्यामुळेच गावकऱयांना जीव धोक्यात घालून महामार्ग ओलांडत तलावामध्ये आंघोळीसाठी जावे लागते. दोन हंडे पाणी दिवसभर कसे पुरणार, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला आहे. आम्हाला पुरेसे पाणी द्या, भटपंतीपासून वाचवा, अशी मागणी करण्यात आली आहे.