ठाण्यात तीन दिवस ‘पानी कम’; महानगर गॅसच्या कामांमुळे जलवाहिनीला धक्का

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीमध्ये बिघाड झाला आहे. शनिवारी कल्याण फाटा येथे महानगर गॅसच्या कामांमुळे जलवाहिनीला धक्का लागला आहे. पाणीपुरवठा विभागामार्फत जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम दोन दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे ठाणे शहराला होणारा पाणीपुरवठा कमी झाला असून पुढील तीन दिवस शहरात ‘पानी कम’ असणार आहे.

ठाणे शहराला पाणीपुरवठा करणारी पिसे बंधार येथून टेमघर जलशुद्धीकरण केंद्राकडे पाणी वाहून आणणारी एक हजार मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी नादुरुस्त झाली आहे. पाणीपुरवठा विभागामार्फत जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम मागील दोन दिवसांपासून सुरू आहे. परंतु जलवाहिनी जुनी व प्रिस्ट्रेस काँक्रीट पद्धतीची असल्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी अडथळा येत आहे. या कामांसाठी आणखी तीन दिवस लागण्याची शक्यता पाणीपुरवठा विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये ३० टक्के पाणी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.

भिवंडीत जलवाहिनी बदलण्याचे काम सुरू
मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा धरणातील जलवाहिनी बदलण्याचे काम भिवंडी तालुक्यातील गुंदवली येथे आजपासून सुरू झाले आहे. हे काम उद्या मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत चालणार आहे. त्यामुळे भांडुपला होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. दरम्यान १५ टक्क्यांपर्यंत पाणी कपात होणार असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.