पुण्यात पाणीबाणी, तीन दिवस पाणी नसल्याने नागरिक हैराण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पुणे

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आदेश दिल्यानंतरही पालिकेच्या बंद केलेल्या दोन पैकी केवळ एकच पंप सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे एकुण तीन पैकी केवळ दोनपंप सुरु असुन अदयापही एक पंप बंद असल्यामुळे पाणी कपात सुरुच आहे. पाटबंधारे विभागाची मुजोरी सुरुच असल्याने शहराच्या पुर्वभागाचा पाणी पुरवठा तीन दिवस बंद आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या वेळी पाणीबाणी निर्माण झाल्याने पुणेकर हैराण झाले आहेत.

पाणीकपात करावीच लागेल अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली. तसेच लवकरच पाटबंधारे खात्यातील अधिकार्‍यांशी बैठक झाल्यानंतर पाणी पुरवठ्याचे नवे वेळापत्रक जाहीर केले जाईल असेही त्या म्हणाल्या.

पुणेकरांनी पाणी काटकसरीने वापरावे असा सल्ला जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिला आहे. तर पुणे महापालिकेला जेवढा पाण्याचा कोटा दिला आहे, त्याहून अधिक पाणी महपालिका घेत असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे शहरासह ग्रामीण भागातील शेतकर्‍यांनाही पाणी द्यावे लागते. त्यामुळे पुणेकरांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन त्यांनी केले.