
>> बाबासाहेब गायकवाड
आगामी सिंहस्थ पुंभमेळा आणि वाढती लोकसंख्या यामुळे निर्माण होणारा पाणीप्रश्न मिटविण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महत्त्वाकांक्षी किकवी धरणाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. मात्र प्रत्यक्ष काम सुरू करण्याच्या दिशेने कुठल्याही हालचाली होत नसल्याने हा प्रकल्प सिंहस्थापूर्वी पूर्ण होण्याची शक्यता धूसर झाली आहे. सिंहस्थात गोदावरी नदी अखंड प्रवाहीत राहणे अशक्य असून या काळात नाशिक, त्र्यंबकेश्वरला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
नाशिक शहराला गंगापूर आणि मुकणे धरणातून सध्या पाणीपुरवठा केला जात आहे. झपाटय़ाने विकसित होणारी लोकवस्ती, वाढती लोकसंख्या यामुळे भविष्यात आणखी पाण्याची आवश्यकता भासणार आहे. गंगापूर धरणातील गाळाचे प्रमाण वाढत असल्याने त्याची साठवण क्षमता कमी होत चालली आहे. भविष्यात पाणीप्रश्न गंभीर होऊ नये यासाठी महापालिकेने सन 2009 मध्ये किकवी प्रकल्प प्रस्तावित केला होता. त्यानुसार सन 2021 मध्येच या प्रकल्पातून शहराला एक टीएमसी पाणी मिळणे अपेक्षित होते. काही शासकीय अडचणींमुळे हा प्रकल्प दुर्लक्षित झाला होता. सन 2024 ची विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून सत्ताधाऱयांनी या प्रकल्पाची पुन्हा हवा निर्माण केली. ऑगस्टमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकल्पाला वेग देण्याची घोषणा केली. ऑक्टोबरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यताही देण्यात आली. विधानसभा निवडणुकीनंतर तीन महिने पुन्हा सर्वांना विसर पडला.
पालकमंत्री नसले तरी स्वतःला पुंभमेळा मंत्री म्हणवून घेणारे गिरीश महाजन यांनी 9 मार्चला श्रीरामपुंड, तपोवन परिसर आणि नाशिकरोड रेल्वे स्थानक परिसराची पाहणी केली. या नाशिक दर्शन यात्रेत त्यांना गोदावरी प्रदूषणाचे दर्शन घडले. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात सिंहस्थ कामांची आढावा बैठक झाली. गोदावरीचे पाणी स्वच्छ राहावे यासाठी धरणातून पाणी सोडून ते अखंडपणे प्रवाहीत ठेवणे आवश्यक आहे, असे अधिकाऱ्यांनी सूचित केले. प्रयागराजच्या पुंभमेळ्यात भाविकांची अंदाजापेक्षा अधिक गर्दी झाली. नाशिकमध्ये त्यापेक्षा तीन ते चारपट गर्दी होईल, असा अंदाजही काढण्यात आला. यासाठी सध्याचा उपलब्ध पाणीसाठा कमी पडेल, यावरही चर्चा झाली. पुंभमेळ्यात पाणी टंचाई निर्माण होऊ नये, नदीचे पाणी स्वच्छ व प्रवाहीत राहावे, यासाठी दीड वर्षात किकवी धरण पूर्ण करण्यात येईल, अशी घोषणाच गिरीश महाजन यांनी त्या वेळी केली. दीड महिना उलटल्यानंतरही किकवी धरणाचे प्रत्यक्ष काम सुरू होण्याच्या दिशेने कुठलीही पावले अद्याप उचलली गेलेली नाहीत. सुमारे दीड हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दहा गावांतील सुमारे साडेसातशे एकर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे, त्यासाठी अंदाजे सातशे कोटी रुपयांची आवश्यकता आहे. वनविभागाची जमीन ताब्यात घेण्याबाबतही पूर्तता बाकी आहे. सिंहस्थासाठी सन 2026 मध्ये या धरणाचे काम पूर्ण होण्याची शक्यता धूसर झाली आहे. गंगापूर धरणाला 65 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यात मोठय़ा प्रमाणात गाळ असल्याने पाणी साठवण क्षमता 50 टक्क्याने कमी झाली आहे. एक वर्षात वाढणारी लोकसंख्या आणि सिंहस्थात होणारी विक्रमी गर्दी लक्षात घेता पुंभमेळ्यात नाशिक, त्र्यंबकेश्वरला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.