
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबईत पेडर रोड येथे असलेल्या व्हर्टिकल गार्डनमध्ये उंच झाडांवर पालिकेच्या वतीने पाण्याचा फवारा मारण्यात येत आहे. दक्षिण मुंबईत रोजच्या रोज मोठ्या प्रमाणावर वाहनांची, माणसांची वर्दळ असते. हवेचा वेगही मोठा असतो. त्यामुळे चोहोबाजूंनी येणारी धूळ झाडांवर बसते. ही धूळ झटकून झाडांना मोकळा श्वास देण्यासाठी पालिका कर्मचारी झाडांवर पाण्याचा फवारा मारत असल्याचे चित्र सध्या मुंबईत आहे.
व्हर्टिकल गार्डनमध्ये उंच झाडे आहेत. तसेच हे ठिकाणही उंचावर असल्याने तेथील उंच झाडांना पाणी घालताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे स्प्रे पंपाच्या माध्यमातून झाडांवर पाण्याचा फवारा मारण्यात येत असल्याचे सहाय्यक उद्यान अधीक्षक ऋषिकेश केंद्रे यांनी सांगितले. झाडांवरच्या दाट पानांवर मोठ्या प्रमाणावर धूळ बसलेली असते. ही धूळ झटकण्यासाठी आणि झाडांची पाने स्वच्छ दिसण्यासाठी तसेच झाडांना मोकळा श्वास देण्यासाठी पाण्याचा फवारा मारण्यात येत असल्याचे केंद्रे म्हणाले.
कीड पडण्याचा धोका नाही
थंडीत झाडांच्या पानावर दवबिंदू तयार होते. थंडीत मोठ्या प्रमाणावर धुके पडते त्यामुळे झाडांना कीड लागते. या किडीपासून झाडांचे संरक्षण करण्यासाठी औषधांचा फवारा मारण्यात येतो. परंतु यंदा अशी परिस्थिती नाही. झाडांना कुठल्याही प्रकारची कीड लागलेली नाही असेही केंद्रे यांनी सांगितले.



























































