नगरमध्ये साडेतेवीस हजार नागरिकांना टँकरने पाणी पुरवठा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाउन  सुरू असतानाच आता जिल्ह्यातील 11 गावे आणि 41 वाड्यावस्त्यांवरील जवळपास 23 हजार 598 नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या नागरिकांची तहान भागविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 13 टँकर सुरू केले आहेत. आता टँकरचे पाणीवाटप करताना सोशल डिस्टंन्सिंग पाळण्यासोबतच गर्दी होणार नाही, याचीही खबरदारी घ्यावी लागणार आहे.

मागील वर्षी म्हणजेच 2019 मध्ये जून ते ऑक्टोबर या काळात जिल्ह्यात विक्रमी पावसाची नोंद झाली होती. भूजल पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे मार्च महिन्यापर्यंत जिल्ह्यातील कोणत्याही गावात पाणीटंचाईची समस्या निर्माण होणार नाही, असा अंदाज भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने वर्तवला होता. त्याप्रमाणे यंदा मार्च महिन्यापर्यंत कोणत्याही गावात टँकर सुरू करण्याची वेळ प्रशासनावर आली नाही; मात्र, एप्रिल सुरू होताच जिल्ह्यातील काही गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण होऊ लागली असून पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्याबाबतचे प्रस्तावही जिल्हा प्रशासनाकडे दाखल केले जाऊ लागले आहेत. नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होऊ नयेत, यासाठी जिल्हा प्रशासनाकडूनसुद्धा तातडीने दखल घेऊन आवश्यक तेथे टँकर सुरू करण्यात आले आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार आतापर्यंत नगर तालुक्यात 2 टँकरद्वारे 2 गावे व 10 वाड्यावस्त्यांवरील 3 हजार 224 नागरिकांना, कर्जत तालुक्यात 1 टँकरद्वारे 1 गावातील 1 हजार 250 नागरिकांना, जामखेड तालुक्यात 8 टँकरद्वारे 6 गावे व 20 वाड्यावस्त्यांवर 15 हजार 207 नागरिकांना व श्रीगोंदे तालुक्यात 2 टँकरद्वारे 2 गावे व 11 वाड्यावस्त्यांवरील 3 हजार 917 नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे.