नगरकरांसाठी पाण्याची बोंबाबोंब; पालिकेने 3 कोटी थकबाकी न भरल्याने पाणीपुरकठा खंडित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

थकीत तीन कोटींच्या वीज बिलामुळे ‘महावितरण’ने काल सायंकाळी सात वाजता नगर मनपाच्या पाणीपुरवठा विभागाचा वीजपुरवठा खंडित केला. आज दुपारी हा वीजपुरवठा सुरू करण्यात आलेला नाही. परिणामी, पाणीउपसा बंद झाल्याने काल सायंकाळपासून शहराचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. आज सकाळपासून शहरात पाण्याचा ठणठणाट निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे.

मनपाच्या पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून नगर शहर व उपनगराला पाणीपुरवठा केला जातो. मनपाने त्याचे वीज बिल थकविल्याने महावितरणने मनपाच्या शहर पाणीपुरवठा योजनेवरील मुळानगर पंपिंग स्टेशन येथील वीजपुरवठा काल सायंकाळी सात वाजता बंद केला. आज दुपारी 1 वाजेपर्यंत तो सुरू करण्यात आला नाही. याबाबत महापालिकेकडे चौकशी केली असता, जवळपास सव्वातीन कोटी रुपये थकीत असून, हे बिल डिसेंबरअखेरचे असल्याचे सांगण्यात आले. त्यापूर्वीचे सर्व पैसे जमा केले असून, उर्वरित पैसे लवकरच जमा करू, असे महावितरणला सांगूनही वीजपुरवठा तोडल्याचे सांगण्यात आले.

महापालिकेला पाणीपुरवठा, पथदिवे, कार्यालयातील वीज यापोटी काही कोटी वीज बिल येते. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असल्याने महापालिकेची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. तरीही पैशांची जुळवाजुळव करीत महापालिका वीज बिलाचे पैसे जमा करीत असते. अत्यावश्यक खर्चाच्या यादीत वीज बिल वरच्या क्रमांकावर असते. चालू बिलदेखील वेळेत जमा करणे महापालिकेला अशक्य होत आहे.

जकात बंद झाल्यापासून घायकुतीला आलेली महापालिकेची आर्थिक स्थिती अद्यापि सुधारायला तयार नाही. गेल्या काही महिन्यांत महापालिकेने महावितरणकडे जवळपास 25 कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा केली आहे. नोव्हेंबरअखेरपर्यंतचे पाणीपुरवठा योजनेचे चालू वीज बिल निरंक केल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. 19 जानेवारीअखेरपर्यंत पाणी योजनेच्या वीज बिलापोटी महापालिकेकडे तीन कोटी 20 लाख 37 हजार 697 एवढी थकीत रक्कम असल्याचे सांगण्यात आले.

सध्या महापालिकेकडे एवढे पैसे नसल्याने ते टप्प्याटप्प्याने देण्यात येतील, असे आयुक्त डॉ. जावळे यांनी स्पष्ट केले. महावितरण अधिकाऱयांनाही याबाबत आश्वस्त केले होते. मात्र, कारवाई करण्याचा निर्णय घेत महावितरणने बुधवारी सायंकाळी सात वाजता मुळा धरणावरील महापालिकेच्या मुख्य उपसा केंद्रातील वीजपुरवठा तोडला. त्यामुळे गुरुवारी नगर शहरात कुठेच पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. एक प्रकारे शहरात ‘पाणीबाणी’ आहे.

कर्मचारी सर्वेक्षणात, वसुली ठप्प

मागासवर्ग आयोगाकडून मराठा आरक्षणासंदर्भात सर्वेक्षणाचे आदेश आहेत. वेळेत सर्वेक्षण करणे आवश्यक असल्याने महापालिकेचे कर्मचारी यात गुंतले आहेत. त्यांना सध्या सर्वेक्षणाचे काम प्राधान्याने करण्याचे आदेश असल्याने वसुलीचे काम पूर्णतः ठप्प आहे. त्यामुळे लगेच मनपाच्या तिजोरीत पैसे येणे शक्य नाही. एकीकडे तिजोरी रिकामी आणि दुसरीकडे महावितरणने वीज बिलासाठी पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा कट केला आहे.