![water](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/05/water-696x447.jpg)
महालक्ष्मी रेसकोर्स आवारातील 1200 मिलिमीटर व्यासाच्या बटरफ्लाय व्हॉल्व्हची दुरुस्ती केली जाणार आहे. यासाठी जी दक्षिण विभागातील वरळी बीडीडी चाळ, डिलाईल मार्ग, करी रोड आणि लोअर परळ भागाचा पाणीपुरवठा शुक्रवार, 24 मे रोजी पहाटे 4.30 ते सकाळी 7.30 या तीन तास कालावधीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे या परिसरातील रहिवाशांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.
महालक्ष्मी रेसकोर्स आवारातील 1200 मिलिमीटर व्यासाच्या बटरफ्लाय व्हॉल्व्हला बुधवारी रात्री मोठय़ा प्रमाणात गळती लागली. याची माहिती मिळताच मुंबई महापालिका जल अभियंता विभागाच्या कर्मचाऱयांनी अहोरात्र कार्यरत राहून ही गळती थोपवून धरली आणि पाणीपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात सुरळीत केला आहे.
जलवाहिनी वेगळी करून दुरुस्ती
पाणीपुरवठा नियमित आणि पुरेशा दाबाने होण्यासाठी व्हॉल्व्ह दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यानुसार गळती दुरुस्तीचे काम आज रात्री 10 वाजता हाती घेण्यात येणार आहे. पाण्याच्या उच्च दाबामुळे व्हॉल्वच्या सांध्यामध्ये शिसे (लीड जॉइंट) ओतणे शक्य नाही. त्यासाठी जलवाहिनीचे अलगीकरण केले जाणार आहे.
पालिका अधिकाऱयांकडून पाहणी
रेसकोर्स आवारातील बटरफ्लाय व्हॉल्व्हच्या टेलपीस सॉकेट जॉइंटमधून 22 मे रोजी रात्री मोठय़ा प्रमाणात गळती होत असल्याचे आढळले. खालच्या बाजूचा लीड जॉइंट पूर्णपणे बाहेर आल्याचे आढळले. जल अभियंता विभागातील वरिष्ठ अधिकाऱयांनी घटनास्थळी भेट देत त्याची पाहणी केली.