कल्याण, डोंबिवलीत दर तीन महिन्यांनी 10 कोटींची पाणीचोरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
water-tab

सामना ऑनलाईन, कल्याण

डोंबिवली व कल्याण शहरातील पंधरा हजार नळांना मीटरच बसवले नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. यामुळे हजारो रहिवासी बिनधास्तपणे पाण्याची धो-धो चोरी करीत असून त्याचा फटका महापालिकेच्या तिजोरीवर बसत आहे. दर तीन महिन्यांनी 10 कोटी रुपयांचे नुकसान होत असून अधिकारी व ठेकेदार यांच्या साटेलोटय़ामुळे  महसुलावर पाणी सोडावे लागत आहे. महापालिका क्षेत्रातील काही भागात पाण्याची टंचाई जाणवत असतानाच दुसरीकडे राजरोसपणे पाणीचोरी करून डल्ला मारला जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.

कल्याण-डोंबिवलीची लोकसंख्या 18 लाखांच्या घरात आहे. उल्हास आणि काळू नदीतून पालिका दररोज 345 दशलक्ष लिटर पाणी शहरवासीयांना पुरवते. दरवर्षी पालिकेला पाण्यावर सरासरी 65 कोटी रुपये खर्च होतो. वसुली मात्र सरासरी 55 कोटी होते. थकबाकीचे प्रमाणही वाढत आहे. त्यातच आता पाणीकपातीला करदात्यांना तोंड द्यावे लागत असताना 15 हजार नळांना मीटरच नसल्याने अनेक भागात पाणी बिलेच दिली जात नाहीत.

सर्वाधिक पाणीचोरी एमआयडीसी भाग, कल्याण पूर्व, डोंबिवली ग्रामीण भाग आणि 27 गावांत होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. याच भागात नळांना मीटर न बसवताच वारेमाप पाणी फुकट वापरले जात आहे. निवासी आणि व्यापारी वापरातील 25टक्क्यांहून अधिक नळांना मीटरच नसल्याची वस्तुस्थिती आहे. कल्याण-डोंबिवली पालिका कार्यक्षेत्रातील प्रत्येक पाण्याच्या नळजोडणीला मीटर बसवण्यासाठी चेतस या ठेकेदाराला चार कोटींचा ठेका दिला होता. मात्र कंपनीने यामध्ये घपला केल्याने पालिकेचे नुकसान होत आहे.

मुख्य जलवाहिनीला छिद्र पाडून जोडण्या

महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता चाळ, झोपडपट्टी वसाहत असलेल्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात मुख्य जलवाहिनीला छिद्र पाडून भूमाफियांनी नळजोडण्या घेतल्या आहेत. भूमाफिया, पाणी चोर आणि पाणी विभागातील काही अधिकारी-कर्मचारी यांच्या रॅकेटमुळे पालिकेच्या तिजोरीवर खर्चाचा बोजा वाढत आहे. भरीस भर म्हणून 27 गावांची जबाबदारीही पालिकेवर आहे.