
आजरा, चंदगड आणि गडहिंग्लज विभागातील पांढरे सोने असलेले काजू पीक यावर्षी कमालीचे धोक्यात आले आहे. दिवसागणिक बदलणाऱया थंड आणि गरम हवामानाच्या विळख्यात हे पीक सापडले आहे. या विभागातील शेतकऱयांच्या आर्थिक व्यवहाराचा कणा असलेले काजूचे हे पीक यावर्षी नेहमीपेक्षा 50 टक्केदेखील मिळणार नसल्याची भीती जाणकार व्यक्त करीत आहेत. त्यामुळे येथील काजू शेतकरी आणि त्यावर प्रक्रिया करणारे उद्योजकदेखील कमालीचे हवालदिल झाल्याचे चित्र सगळीकडे दिसून येत आहे.
काजू पिकाचा यावर्षीचा हंगाम सुरू होताना झाडांना मोहोर विपुल प्रमाणात आला खरा; पण हवामानातील चंचलता त्यास प्रतिकूल ठरली. काजूच्या झाडांवर फळधारणा चांगली होत असल्याचे चित्र ठळक झाल्याने सुरुवातीला शेतकरी खूश होते; मात्र, गेल्या दोन महिन्यांत हवामानातील बदल काजूफळांच्या विकास व वाढीवर प्रतिकूल ठरला असल्याने अस्वस्थता वाढते आहे. दरम्यानच्या कालावधीत पाऊस झाल्याने करपलेला मोहोर धुऊन गेला. आता नव्याने मोहोर आला असला आणि फळधारणा होत असली, तरी येत्या काळातील अवकाळी पाऊस आणि हवामान कितपत स्थिर राहणार, यावर पांढऱया सोन्याच्या उत्पादनाची गणिते अवलंबून आहेत. या पार्श्वभूमीवर 50 टक्केही पीक शेतकऱयांच्या हाती लागले तरी खूप होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. याचा परिणाम अर्थातच बाजारपेठेत दिसणार असून, काजूबिया लगेच विक्रीस न काढता साठवून ठेवल्या तरच शेतकऱयांना चांगला दर मिळू शकेल, अशी मते व्यक्त होत आहेत.
या विभागात साधारणतः दोनशे टनांपर्यंत काजूबिया उत्पादीत होतात. त्यामुळे अनेकांनी काजूबागा विस्तारल्या. अनेक तरुणांकडून काजू प्रक्रिया उद्योग उभारले गेले. या उद्योगाने कित्येक महिलांच्या हातालाही काम दिले आहे. हजारो महिलांना यामुळे रोजगार मिळाल्याने हा उद्योग त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधनच बनला आहे; मात्र या उद्योगातील कच्च्या मालाच्या उत्पादनावर हवामान चढ-उताराचा परिणाम नेहमीच होत आला आहे. परिसरातील लहरी वातावरणाने यावर्षीचे संकट गहिरे आहे. गेल्या वर्षी चढा दर मिळाल्याने शेतकरी कधी नव्हे ते खूश होता. मात्र, त्यावर विरजण पडणार आहे. सध्या काजूबियांची आवक कमी असल्याने व्यापारीवर्गामध्ये खरेदीसाठी चढाओढ होणार आहे.
बदलत्या हवामानामुळे मोहोर करपला
ऑक्टोबर महिन्यापासून चांगले वातावरण राहिल्याने काजूला यावर्षी भरपूर मोहोर आला, पण बदलत्या हवामानामुळे मोहोर करपून गेला. तसेच सध्या अधून-मधून दिवसभर ढगाळ वातावरण असते. दिवसा 12 ते दुपारी 4 वाजेपर्यंत गरम हवा आणि सायंकाळी 4 ते सकाळी 9- 10 वाजेपर्यंत थंड वारे आणि आकस्मिकपणे धुके पसरते. हे प्रतिकूल वातावरण काजू पिकास हानिकारक आहे. त्यामुळे काजूबिया लागवड खूपच कमी होणार असल्याची स्थिती आहे. यामुळे येथील काजू प्रक्रिया उद्योजकांना एकतर काजूबिया परराज्यातून अथवा परदेशातून आयात करणे, अथवा चढा दर देण्याशिवाय पर्याय नसेल.




























































