विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेचा मार्ग मोकळा; तीन महिन्यांत निविदा

मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक  कोंडी दूर करण्याबरोबरच वेगवान प्रवासासाठी विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेसाठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रशासकीय व प्रकल्पाच्या भूसंपादनासाठीही मान्यता दिली आहे. त्यामुळे 37 हजार 13 कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

विरार-अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिक प्रकल्प हा मुख्यतः जेएनपीटी तसेच प्रस्तावित नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ आणि ट्रान्स हार्बर लिंकला जोडण्यात येणार आहे. हा महामार्ग मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग, कल्याण-मुरबाड निर्मळ राष्ट्रीय महामार्ग, तळोजा बायपास, मुंबई-वडोदरा एक्सप्रेस वे, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, मुंबई-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग, पनवेल-उरण राष्ट्रीय महामार्ग तसेच मुंबई-गोवा महामार्ग या महत्त्वाच्या महामार्गांनाही जोडणार आहे.

असा असेल हा मार्ग

ही मार्गिका प्रकल्प ‘बांधा-वापरा हस्तांतरित करा’ या तत्त्वावर बांधण्यात येणार असून 126.3 कि.मी.ची ही मार्गिका वसई, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, पनवेल, उरण, पेण व अलिबाग या तालुक्यांतून जाणार आहे.

भूसंपादनासाठी 22 हजार कोटी

विरार-बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पासाठी भूसंपादनाची कार्यवाही त्वरीत हाती घेण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या प्रकल्पाकरिता भूसंपादनासाठी 22 हजार 250 कोटी रुपयांची रक्कम खर्च होणार आहे.

दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे वरून आलेल्या वाहनांना थेट जेएनपीटीपर्यंत पोहोचता येणार आहे. या महामार्गातील मोरबे ते करंजाडे हा महामार्ग विरार-अलिबाग मल्टीमोडल काँरीडॉरसोबत एकत्रित बांधण्यात येणार आहे.