
सामना ऑनलाईन। कोलकाता
ओडिशामध्ये हाहाकार उडवणारे फनी हे चक्रीवादळ बंगालमध्ये धडकले असून ताशी 90 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्याबरोबर मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कोलकाता विमानतळावरील सर्व विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. दरम्यान ओरिसामध्ये या वादळाने 10 जणांचे बळी घेतले असून 150 हून अधिक नागरिक वादळाच्या पडझडीत जखमी झाले आहेत. तर लाखो नागरिक बेघर झाले आहेत.
बांग्लादेशात फनी शनिवारी सकाळी धडकणार असा इशारा शुक्रवारीच हवामान खात्याने दिला होता. पण रात्रीच हे चक्रीवादळ बंगालमधील खडगपूर, पूर्व मिदनापूर, मुर्शिदाबाद, उत्तर 24 परगना, आणि दिग्गा या भागात पोहचले. रात्रभर या भागात मुसळधार पाऊस कोसळत होता. दरम्यान, ओरिसाच्या तुलनेत फनी वादळाची तीव्रता बंगालमध्ये कमी असल्याचे समजते. यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. तर खबरदारीचा उपाय म्हणून बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्व प्रचार रॅलीही रद्द केल्या आहेत. तर कोलकाता विमानतळावरील सर्व विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तसेच समुद्र तटालगत असलेल्या सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून हावडा-चेन्नई मार्गावरावरील जवळपास 220 गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.
























































