
संसदेच्या सभागृहांत सीआयएसएफ कमांडो कशासाठी तैनात करण्यात आलेत? आम्ही दहशतवादी आहोत का? निषेध करणे हा आमचा अधिकार आहे. आम्ही लोकशाही पद्धतीने निषेध करू. भविष्यात सीआयएसएफ कमांडोंनी कधीही सभागृहात येऊ नये, असा संताप राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला.
खरगे यांच्या या आरोपांना जे.पी. नड्डांनी आक्षेप घेतला. विरोधी पक्षात राहण्यासाठी माझ्याकडून शिकवणी घ्या, तुम्हाला 30 ते 40 वर्षे विरोधी पक्षातच राहायचे आहे, अशी टीका केली. त्यामुळे विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू केली. गदारोळ सुरूच राहिल्यामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. दरम्यान, सभागृहातील कामकाजाप्रकरणी दिशाभूल करणाऱया तक्रारी करणाऱयांविरोधात काय कारवाई करायची, असा सवाल संसदीय कामकाज मंत्री किरण रिजीजू यांनी केला. सभागृहात त्या दिवशी सभागृहात मार्शल्सच होते, असा दावा रिजीजू यांनी केला.
सलग 22 व्या दिवशी दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब
बिहारमधील मतदार याद्यांच्या फेरतपासणीवरून आजही सलग 22 व्या दिवशी दोन्ही सभागृहांत गदारोळ झाला. त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. बिहारमधील मतदार याद्यांच्या फेरतपासणी प्रक्रियेप्रकरणी दोन्ही सभागृहांत सविस्तर चर्चा करण्याची विरोधकांची मागणी आहे.
सभागृह अमित शहा चालवतात काय?
राज्यसभेत शून्य प्रहरात राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी खरगे यांच्या तक्रारीवर आक्षेप घेतला. गेल्या आठवड्यात सभागृहात झालेल्या गदारोळादरम्यान राज्यसभा सभापतींसमोरील मोकळ्या जागेत निदर्शने करणाऱ्या विरोधकांना सीआयएसएफ कमांडोंनी रोखले होते. त्यानंतर विरोधकांनी याप्रकरणी लेखी तक्रार केली. ही तक्रार प्रसारमाध्यमांसमोर आणण्याला हरिवंश यांनी विरोध केला आणि हे संसदेच्या नियमांचे उल्लंघन असल्याचा आरोप केला. यावर, पोलीस आणि लष्कर आणून तुम्हाला सभागृह चालवायचे आहे का? सभागृह सभापती चालवतात की अमित शहा, असा सवाल खरगे यांनी केला. मात्र, सीआयएसएफ कमांडो संसद सुरक्षेचा एक भाग असून, खरगे सभागृहाची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला.