कश्मिरमध्ये पुन्हा मोठ्या संख्येने पर्यटक यावेत याकरता आम्ही प्रयत्नशील- मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला

जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पुन्हा एकदा पहलगाम हल्ल्यावर आणि त्याचा जम्मू आणि काश्मीरवरील परिणामांवर आपले मत व्यक्त केले आहे. गुजरात दौऱ्यावर असलेले ओमर अब्दुल्ला यांनी (31 जुलै) माध्यमांशी बोलताना सांगितले की, 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्याचा पर्यटन उद्योगावर परिणाम झाला असला तरी, तुरळक पर्यटक आजही कश्मिरला भेट देत आहेत.

पहलगाम पुन्हा एकदा पर्यटकांनी फुलले, कश्मिरच्या खोऱ्यात पर्यटकांची भटकंती वाढली! ओमर अब्दुल्ला

जम्मू आणि काश्मीरमध्ये पर्यटन पुन्हा सक्रिय करण्याच्या उद्देशाने ते गुजरात दौऱ्यावर गेले होते. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पत्रकारांशी बोलताना कबूल केले की, 22 एप्रिलला पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राज्यातील पर्यटन पूर्णतः कोलमडले. या हल्ल्यात गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. यामुळे कश्मिर खोऱ्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. अधिक बोलताना ते म्हणाले, हंगामाच्या सुरुवातीलाच झालेल्या या हल्ल्याने, एका रात्रीत पर्यटक कश्मिर सोडून गेले.

पहलगाममध्ये ओमर अब्दुल्ला यांची विशेष मंत्रिमंडळ बैठक; म्हणाले, दहशतवाद पर्यटन रोखू शकत नाही

ओमर अब्दुल्ला यांनी असेही स्पष्ट केले की, पर्यटकांना पुन्हा एकदा कश्मिरकडे आकर्षित करण्यासाठी सरकारचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. ते म्हणाले, माता वैष्णोदेवी आणि अमरनाथ यात्रेसाठी लाखो भाविक कश्मिरमध्ये पोहोचले आहेत. कश्मिर एक सुरक्षित आणि सुंदर पर्यटन स्थळ आहे हा संदेश देण्यासाठी आम्ही सध्या प्रयत्न करत आहोत.
अधिक बोलताना ते म्हणाले, पर्यटन हा आमच्यासाठी केवळ एक उद्योग नाही. तर पर्यटन ही जम्मू कश्मिरची खऱ्या अर्थाने ओळख आहे. आमच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि तो पुनरुज्जीवित करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.