काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी एमआयएमची साथ सोडणार नाही : प्रकाश आंबेडकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पंढरपूर

राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात आघाडी होत असून एमआयएमची साथ सोडून आघाडीत या असं निमंत्रण आपल्याला आहे, मात्र मी एमआयएमची साथ सोडणार नाही, अशी रोखठोक भूमिका बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केली. होलार समाजाच्या मेळाव्यासाठी पंढरपूर मध्ये आले असताना पत्रकारांशी बोलत होते.

काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात लोकसभेच्या जागा वाटपाबाबत चर्चा सुरू असून या दोन्ही पक्षांनी आघाडीत येण्याचा आग्रह केला आहे. तथापि एमआयएमला बरोबर घेण्यास ते उत्सुक नाहीत मात्र आम्ही एमआयएमची साथ सोडणार नाही. राष्ट्रवादीने तर आम्हाला कोणाबरोबर जायचे अन् कोणाबरोबर नाही हे सांगण्याचे काहीच कारण नाही. ते सनातन्यांची साथ करत असल्याची टीका आंबेडकर यांनी केली.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी कालच जाहीर केले आहे. या मतदारसंघातून आपणासही उभारण्याची मागणी कार्यकर्ते करीत आहेत. या प्रश्नांवर बोलताना ते म्हणाले, सोलापूरमधून लढण्याचा सतत आग्रह सुरू आहे योग्य वेळी हा निर्णय जाहीर करू असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.