
सामना प्रतिनिधी । नांदेड
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारने गेल्या साडेचार वर्षात केलेली लोकहिताची कामे आणि इथे उपस्थित बूथप्रमुखांनी तसेच शक्तीकेंद्रप्रमुखांनी दाखविलेली एकजूट लक्षात घेता आगामी लोकसभेच्या निवडणूकीत अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला नेस्तनाबूत झाल्याशिवाय राहणार नाही, असे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड येथे काढले. भारतीय जनता पक्षाच्या नांदेड जिल्ह्यातील बूथप्रमुख व शक्तीकेंद्रप्रमुखांच्या भक्तीलॉन्स येथे झालेल्या मेळाव्यास मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, मागच्यावेळी भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला होता परंतु गेल्या साडेचार वर्षात परिस्थिती बदलली आहे. त्यावेळी भास्करराव पाटील खतगांवकर, प्रताप पाटील चिखलीकर, सूर्यकांता पाटील, डॉ. माधवराव पाटील किन्हाळकर हे आमच्या बाजूने नव्हते ते आज आमच्या पक्षात आहेत. त्यामुळे आमचा उत्साह द्विगुणित झाला आहे. आपण एकजूटीने लढलो तर कोणतीही ताकद आपल्याला हरवू शकत नाही, असे ही ते म्हणाले.
खासदार अशोक चव्हाण यांच्या आदर्श घोटाळ्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी करताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले मला तुम्हा नांदेडकरांचे कौतुकच वाटते. तुम्हाला फक्त आदर्श घोटाळाच माहिती आहे. अहो, त्यांचे गाडीभर घोटाळे आहेत. पण आत्ताच सांगतो पाई पाई का हिसाब देना पडेगा. मुख्यमंत्र्यांच्या या वाक्यानंतर संपूर्ण हॉल टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेला.
काँग्रेस प्रणित महाआघाडीमध्ये निती आणि नेता यांचा अभाव असल्यामुळे पंतप्रधान पदाचा उमेदवार निश्चित नसल्यामुळे या खिचडीचे काही खरे नाही हे स्पष्ट करतांना मुख्यमंत्री म्हणाले की, चुकून हे सत्तेत आलेच तर त्यांना पंतप्रधान पद असे वाटून घ्यावे लागेल. सोमवारी मायावती, मंगळवारी ममता, बुधवारी अखिलेश, गुरूवारी चंद्रबाबु नायडू, शुक्रवारी – स्टॅलीन, शनिवारी – शरद यादव आणि रविवारी सुट्टी असल्यामुळे शरद पवार. शिवाय महिन्याच्या शेवटी एखादा तास राहुल गांधी, असा टोलाही त्यांनी लगावला.


























































