
सामना ऑनलाईन । श्रीनगर/नवी दिल्ली
देशावरील महाभयंकर दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या आपल्या बहादूर जवानांच्या बलिदानाचा बदला घेऊ. हा हल्ला कधीच विसरणार नाही, दहशतवाद्यांना सोडणार नाही, असा खणखणीत इशारा केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) पाकिस्तानला दिला आहे. दरम्यान, हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांचा आक्रोश सुरू असून पाकडय़ांना कायमचा धडा शिकवा, अशी मागणी होत आहे. दुसरीकडे राजधानी दिल्लीत घडामोडींना वेग आला असून पुढील रणनीती ठरविण्यासाठी मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची बैठक झाली. यात पाकिस्तानला दिलेला ‘मोस्ट फेवर्ड नेशन’चा दर्जा काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. पाकच्या पेकाटातच लाथ घालण्यात आली आहे.
अडीच हजार ‘सीआरपीएफ’ जवानांना घेऊन जाणाऱया ताफ्यात काल जम्मू-श्रीनगर महामार्गावर पुलवामा येथील अवंतीपुरा येथे महाभयंकर हल्ला झाला. 200 वर किलो स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफ जवानांच्या एक बसवर आदळली. हा आत्मघाती स्फोट जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केला. आजपर्यंतचा हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. सीआरपीएफने अधिकृत जाहीर केल्याप्रमाणे 40 जवान शहीद झाले आहेत.
या हल्ल्यानंतर अवघ्या देशात पाकडय़ांचा बदला घ्या अशी भावना आहे. सीआरपीएफने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पुलवामा येथे शहीद झालेल्या आपल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. ट्विटसोबत श्रद्धांजलीपर एक छायाचित्रही प्रसिद्ध केले आहे. या ट्विटमध्ये ‘सीआरपीएफ’ने पाकिस्तानला खणखणीत इशारा दिला आहे. ‘पुलवामामध्ये हौतात्म्य आलेल्या आमच्या बहादूर जवानांना आम्ही सॅल्युट करतो. आम्ही या जवानांच्या कुटुंबीयांसोबत आहोत. हा हल्ला आम्ही कधीही विसरणार नाही आणि यासाठी जबाबदार असलेल्यांना कधीच माफ करणार नाही. या भयंकर हल्ल्याचा मुहतोड जवाब देऊ, बदला घेतला जाईल’असे सीआरपीएफने ट्विटमध्ये म्हटले आहे.
सातजणांची धरपकड
श्रीनगर पुलवामातील अनंतपुरा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि कश्मीर पोलिसांनी आज सातजणांना जिल्हय़ात विविध ठिकाणी ताब्यात घेतले आहे. हल्ल्याच्या कटात सहभाग असल्याच्या संशयावरून या सात संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
80 किलो आरडीएक्स होते
केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर हल्ला करण्यासाठी सुमारे 80 किलोग्रॅम आरडीएक्सचा वापर करण्यात आला. हे आरडीएक्स उच्च प्रतीचे होते. हा आरडीएक्सचा साठा कारमध्ये भरून ही कार सीआरपीएफच्या बसला धडकवण्यात आली.
जम्मूत हिंसाचार
पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ आज जम्मूत बंद पुकारण्यात आला होता. बंददरम्यान हिंसाचाराचा भडका उडाला. सकाळपासूनच जम्मूच्या रस्त्यावर निषेध मोर्चे निघाले. चौकाचौकात पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला. गुज्जरनगर भागात आंदोलकांनी वाहनांची जाळपोळ केली. दोन गटांनी एकमेकांवर केलेल्या दगडफेकीत पोलीस महानिरीक्षक विवेक गुप्ता यांच्यासह 40 जण जखमी झाले. परिस्थिती आटोक्याबाहेर गेल्यामुळे दुपारी शहरात संचारबंदी लावण्यात आली.
चीनचा दुतोंडीपणा
पुलवामातील हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि ‘जैश-ए- मोहम्मद’चा म्होरक्या मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची मागणी हिंदुस्थानने संयुक्त राष्ट्रात अनेक वेळा केली, मात्र चीनने व्हेटोचा अधिकार वापरून त्याला कायम विरोध केला आहे. आजही चीन सरकारचे प्रवक्ते गुआंग शुआंग यांनी पुलवामा हल्ल्याचा निषेध केला, पण मसूद अजहरवर चीनची भूमिका बदलली नसल्याचे स्पष्ट केले. पठाणकोट हल्ल्यानंतर हिंदुस्थानने मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची मागणी संयुक्त राष्ट्रात लावून धरली आहे.
दहशतवाद रोखा : अमेरिकेचा पाकला इशारा
पुलवामा हल्ल्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवरही संतप्त पडसाद उमटले आहेत. अमेरिकेने पाकिस्तानला थेट शब्दांत इशारा देत दहशतवादविरोधातील लढाईत आम्ही हिंदुस्थानबरोबर आहोत असे ठणकावले. शहीद जवानांच्या कुटुंबांप्रति आम्हाला सहानुभूती आहे असे व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या सारा सँडर्स म्हणाल्या. पाकिस्तानने दहशतवादाला खतपाणी घालणे बंद करावे असा इशाराही त्यांनी दिला. रशिया, इस्रायल, फ्रान्स, जर्मनी, मालदीव, बांगलादेश, थायलंड, श्रीलंका, झेक रिपब्लिक, कॅनडासह अनेक देशांनी पुलवामा हल्ल्याचा तीक्र शब्दांत निषेध केला. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी हल्ल्याचा कट रचणाऱयांना कडक शिक्षा झालीच पाहिजे अशी भावना व्यक्त केली.
संकटाच्या काळात आम्ही सरकारसोबत; राहुल गांधी यांची ग्वाही
देशाला तोडणे हा दहशतवाद्यांचा मनसुबा आहे, मात्र ते यात कधीही यशस्वी होणार नाहीत. संकटाच्या या काळात आम्ही विरोधक सरकारसोबत आहोत अशी ग्वाही काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली. ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाने 40 जवान गमावले आहेत. शहीद जवानांच्या कुटुंबांसोबत आम्ही आहोत असे त्यांनी सांगितले. दहशतवादाच्या विरोधात एकजूट होऊन लढण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असेही ते म्हणाले.




























































