
महाराष्ट्रात अजूनही थंडी सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. दोन आठवड्यांपूर्वी रात्री आणि पहाटेच्या वेळी वातावरणात गारवा जाणवत होता. मात्र, दिवसभर उकाडा कायम होता. तसेच अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाली होती. आता वातावरणात पुन्हा बदल झाल्याने हवामान खात्याने राज्यात थंडीच्या आगमनाचे संकेत दिले आहेत.
उत्तर हिंदुस्थानात थंडीची लाट कायम आहे. उत्तरेकडून येणारे थंड वारे राज्यातील थंडीसाठी पोषक ठरणार आहेत. मध्य आणि पूर्व हिंदुस्थानात येत्या 48 तासात तापमानात घट होणार आहे. पुढील दोन दिवसात देशातील मध्य आणि पूर्व भागात तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याचा परिणाम राज्यावरही होणार आहे. या थंड वाऱ्यांमुळे राज्याच्या विविध भागात किमान तापमानात घट होणार आहे आणि थंडीची सुरुवात होणार आहे. तसेच राज्यातील काही भागात 19 जानेवारीनंतर थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
राज्यातील कमाल तापमानही कमी होण्याची शक्यता असून 25 जानेवारीपर्यंत थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे,असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. राज्यात उशिरा थंडीची सुरुवात झाली. मात्र त्यानंतर लगेचच अवकाळी पावसाला सुरुवात झाली. अवकाळी पावसाचे सावट सध्या दूर झाले आहे आणि पुन्हा एकदा थंडीची चाहूल लागणार आहे.
राज्यातील हवामान कोरडे राहणार आहे. थंडीचा परिणाम विदर्भातही जाणवणार आहे. मध्यप्रदेशकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे विदर्भात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथेही येत्या दोन-तीन दिवसात किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशभरातच थंडीचा पारा घसरणार आहे. पुढील तीन दिवस उत्तरेकडे थंडीची लाट दिसून येणार आहे. मध्य आणि पूर्व भारतात येत्या 48 तासात दोन ते तीन अंश सेल्सिअसने तापमानात घट दिसून येईल. मंगळवारपर्यंत पुन्हा एकदा नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार होऊ शकतो आणि त्यानंतर देशातील हवामानात बदल घडून येऊ शकतो, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.


























































