
>> शमिका कुलकर्णी
पावसाळा संपताच उकाडा वाढू लागतो आणि मग ऑक्टोबर हीट. त्याबरोबर कोरडी हवा, सर्वच हिवाळ्याची वाट पाहत असतात. पण या उकाडय़ात आपल्याला आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. पण काहींना पाणी भरपूर पिणे शक्य होत नाही. पण त्यामुळे डिहायडेशनची भीती असते. मग पाण्याऐवजी अनेक कृत्रिम घरगुती पेये येतात. पण पारंपरिक पद्धतीची घरगुती पेय चविष्ट आणि गुणकारी असतात.
चविष्ट लिंबूपाणी – उकाडय़ावर रामबाण घरगुती उपाय म्हणजे लिंबूपाणी. लिंबूपाणी अधिक चविष्ट बनवण्यासाठी 2 ग्लास पाण्यात एका लिंबाचा रस, थोडे किसलेले आलं, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली पुदिन्याची पानं आणि एक चमचा मध. हे सर्व पातेल्यात एकत्र ढवळून घ्यावे. चविष्ट लिंबूपाणी तयार आहे. हे शरीरात थंडावा निर्माण करतं व थकवाही दूर करण्यास मदत होते.
मसाला ताक – मसाला ताक अतिशय चविष्ट, पौष्टिक आणि सोपं पेय आहे. यासाठी घरचे दही, तितकंच पाणी, चवीनुसार मीठ, जिरा पूड घालून रवीने घुसळून घ्यावे. आवडीनुसार त्यात आलं आणि मिरचीही वाटून लावू शकतो. असे घुसळलेले ताक अतिशय आरोग्यदायी असते.
कोकम सरबत – पारंपरिक कोकम सरबत पित्तशामक आणि ऊर्जादायी असतं. रातांब्यापासून बनवलेले हे सरबत. हे सरबत कोकम वापरूनही करू शकतो. घरगुती केलेले सरबत गरजेइतकेच गोड करू शकतो. पाण्यात कोकम, जिरा पूड, मीठ चवीनुसार घालावे. मग ते भिजत ठेवून त्याचा अर्क गाळून त्यात मध किंवा गूळ घालून उत्तम कोकम सरबताचा आनंद घ्यावा.
नारळ पाणी – शहाळ्याचे पाणी म्हणजे उकाडय़ावर रामबाण उपाय. भारतात अनेक पिढया नारळ पाण्याचा आनंद घेत उकाडय़ावर मात करत आलेल्या आहेत. नारळ पाणी नैसर्गिक, स्वच्छ आणि शरीरात थंडावा निर्माण करणारे असतं. म्हणूनच शहाळी घेऊन प्रत्येकानेच नारळ पाणी आणि त्यातील मलई यांचा आनंद घ्यावा.
सब्जा कूलर – सब्जाचे भिजवलेले बी शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते. भिजवलेला सब्जा दूध किंवा पाण्यात घालावा आणि त्यात मध आणि गुलाब पाकळ्या चिरून घालाव्यात. थंडगार पेय अतिशय गुणकारी आणि थंडावा देणारे असतं.
ही सर्व पेयं घरातच तयार करून घरातील सर्वांना त्याचा आनंद द्या. उन्हाळ्यात या घरगुती पेयांचा आनंद घेऊन निरोगी आणि उत्साहात राहा. अशा पारंपरिक पेयांचा समावेश करून शरीराला आवश्यक घटकांचा पुरवठा होतो आणि आरोग्याला गुणकारी ठरतं.



























































