
यंदा अतिपावसानंतर आता विक्रमी थंडी जाणवणार आहे. नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत कडाक्याची हाडं गोठवणारी थंडी असणार आहे. 110 वर्षांत तिसऱ्यांदा या वेळी तीव्र थंडी राहणार आहे. हिमालयातील यंदा 86 टक्के भाग हा दोन महिने आधीच बर्फाने झाकलेला आहे. हिमालयातील तापमान 3 अंश सेल्सिअसने कमी झाले आहे.
या वेळी प्रशांत महासागरात ला निनाचा इफेक्ट असणार आहे. त्यामुळे महासागरातील तापमान हे सामान्यापेक्षा कमी राहणार आहे. ला निनाचा इफेक्ट डिसेंबरमध्ये सक्रिय होईल. यामुळे यंदा हिंदुस्थानात कडाक्याची थंडी राहणार आहे. ला निना उत्तर, मध्य आणि पूर्वेकडील प्रदेशांमध्ये सरासरी तापमान 3-4 अंश सेल्सिअसने कमी करू शकते.
ला निना इफेक्ट जाणवणार
हिमालयाच्या वरच्या भागात म्हणजेच 4 हजार फुटांपेक्षा जास्त उंची असलेल्या भागात सामान्यतः सरासरी तापमान उणे 15 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी असते. ला निना उत्तर, मध्य आणि पूर्वेकडील प्रदेशांमध्ये सरासरी तापमान 3-4 अंश सेल्सिअसने कमी करू शकते.
ऑक्टोबरमध्ये तापमान कमी
ऑक्टोबर या थंडीच्या पहिल्याच महिन्यात कमी तापमान राहिले आहे. भोपाळमध्ये किमान तापमान 15.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्यपेक्षा 3.6 अंश सेल्सिअस कमी आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या सहामाहीत भोपाळमध्ये इतक्या कमी तापमानाची नोंद होण्याची ही गेल्या 26 वर्षांत तिसरी वेळ आहे. राजस्थानमध्ये दिवसा उष्ण आणि रात्री थंड तापमान आहे. सिकरमध्ये रात्रीचे किमान तापमान 15 अंश सेल्सिअसपेक्षा कमी नोंद करण्यात आली.
सिक्कीम, कश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि नेपाळपासून संपूर्ण उंच हिमालयात पांढऱ्या बर्फाची चादर पसरली आहे. पाणलोट क्षेत्रदेखील वाढले आहे.
महाराष्ट्रात तीन ते चार दिवस पाऊस
122 वर्षांत सरासरी तापमान 0.99 अंशांनी वाढले आहे. मात्र 2025 मध्ये तापमानात वाढ होणार नाही, तर ला निनामुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात तूर्तास तीन ते चार दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे. काही शहरांमध्ये तापमानात चढ-उतार होत आहेत. महाराष्ट्रात उष्ण आणि ढगाळ वातावरण आहे. 20 ऑक्टोबरनंतर हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याच्या मते, येत्या काही दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात ऑक्टोबर हीटनंतर थंड वारे अनुभवायला मिळू शकतात. सध्या पश्चिम बंगालच्या उपसागरात दक्षिणेकडे सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाल्याने पावसाचे वातावरण तयार झाले आहे.