
>> स्पायडरमॅन
2017 साली पेरू देशाच्या नाझ्का वाळवंटात सापडलेल्या विचित्र ममीज पुन्हा चर्चेत आल्या आहेत. या ममीजची कहाणी मोठी रंजक आहे. 2017 साली जरी या ममीज सापडलेल्या असल्या तरी त्यांच्याबद्दल दोन वर्षांपूर्वी माहिती उघड करण्यात आली होती. तीन बोटे आणि लांब आकाराची कवटी असलेल्या या ममीज एलियन्स अर्थात परग्रहवासीयांच्या असल्याचा दावा काही संशोधकांकडून करण्यात आला होता. त्यानंतर मेक्सिकोच्या काँग्रेसमध्ये UFO या विषयावर एक चर्चादेखील आयोजित करण्यात आली होती. मात्र काही संशोधकांनी या ममीज खऱ्या नसून कागद, डिंक, धातूचे तुकडे आणि मानवी हाडांच्या मदतीने बनवलेल्या नकली बाहुल्या असू शकतात असा संशय व्यक्त केल्यावर या प्रकरणाला वेगळे वळण लागले.
नुकतीच या ममीजची पुन्हा एकदा विशेष तपासणी पूर्ण झाली असून या ममीज शंभर टक्के खऱ्या असल्याचे समोर आले आहे. तीन बोटांचे आणि लंबुळक्या कवटय़ांचे हे प्राणी कधीकाळी पृथ्वीवर वावरत होते आणि 1200 वर्षांपूर्वी त्यांची हत्या करण्यात आल्याचे तपासणीत उघड झाले आहे. शास्त्रज्ञांनी या ममीजपैकी दोन मादी ममीजना मारिया आणि मोंटसेराट, तर नर ममीला अॅंटोनियो असे नाव दिले आहे. या ममीजचा अभ्यास करताना त्या अंशतः मानव आणि अंशतः अज्ञात प्रजाती असल्याचा निर्वाळा शास्त्रज्ञांनी दिला आहे. या ममीजच्या शरीराचा अभ्यास करण्यासाठी म्हणजेच बोटांचे ठसे, दाताची झीज, हाडांची संरचना, अंतर्गत अवयवांची माहिती मिळवण्यासाठी 21 इतर मृतदेहांचे विश्लेषण करण्यात आले. यातील मारिया ही मादी 35 ते 45 वयोगटातील आणि 5 फूट 6 इंच उंचीची होती. तिच्या खालच्या भागात खोल जखमा आणि चावण्याच्या खुणा आढळून आल्या आहेत. तिच्या मणक्यापासून कमरेपर्यंत अनेक लहान लहान जखमा आढळून आल्या तसेच कातडीदेखील फाटलेली होती. तिला मारून उंचावरून खाली खडकावर फेकले असावे असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. मोंटसेराटच्या छातीवर मोठी जखम आढळून आली आणि कवटीच्या हाडांना आणि बरगडय़ांना अनेक फ्रॅक्चरदेखील झालेले होते.