
>> स्पायडरमॅन
आपल्याकडे वटवाघूळ ह्या प्राण्याकडे फार चांगल्या नजरेने पाहिले जात नाही. तसेही आपल्याकडे वटवाघूळ म्हणजे जंगलात किंवा निर्जन, ओसाड, भुताटकीच्या जागेत राहणारा प्राणी ही ओळख आहे. त्यात परदेशी व्हॅंपायर चित्रपटांनी तर त्याला थेट भुताच्या रांगेत नेऊन बसवले आहे. मात्र ह्या वटवाघुळाची बिहारच्या एका गावात चक्क पूजा केली जाते. त्याला लक्ष्मीचे प्रतीक आणि गावाचे राखणदार म्हणून मानाचे स्थान दिले जाते. बिहारच्या वैशाली जिह्यातील सरसई गावामध्ये हजारो वटवाघुळांचा निवास आहे. सरसई गाव आणि सरसई सरोवराशेजारील वृक्षांवर हजारोंच्या संख्येने ही वटवाघळे लटकलेली असतात. आजवर त्यांच्यामुळे गावात कोणताही आजार पसरलेला नाही अथवा त्यांनी कोणाला इजादेखील केलेली नाही, असे इथले गावकरी सांगतात. ही वटवाघळे इथे आश्रयास आल्यापासून गावात संपन्नता आल्याचे देखील गावकरी आवर्जून सांगतात. तसेच रात्रीच्या वेळी कोणी गावाबाहेरील व्यक्ती गावात आल्यास ही वटवाघळे प्रचंड गोंगाट करतात; मात्र गावातील व्यक्ती रात्री बाहेरून गावात शिरल्यास ती साधा आवाजदेखील काढत नाही. ह्या त्यांच्या स्वभावामुळे गावातले लोक त्यांना लक्ष्मी आणि गावचे राखणदार म्हणून प्रचंड मान देतात.
सरसई आणि आजूबाजूच्या गावात कोरोना काळात कोणालाही रोगाची लागण झाली नाही, असा इथल्या ग्रामस्थांचा दावा आहे. हे सगळे राखणदार वटवाघळांमुळे घडल्याची त्यांची श्रद्धा आहे. गावातील लोक कोणतेही शुभ कार्य करण्याच्या आधी ह्या वटवाघळांची पूजा करतात आणि आशीर्वाद घेतात. विशेष म्हणजे आजकाल ह्या वटवाघळांना बघण्यासाठी अनेक पर्यटक या गावाला खास भेट देत आहेत आणि त्यामुळे गावच्या आर्थिक राजकारणालादेखील सुबत्ता येऊ लागली आहे.