वेब न्यूज – डासांना ‘नो एंट्री’!

पावसाळा चालू झाला की, पावसाच्या सोबतीने आपल्याला छळणारी गोष्ट म्हणजे डास सर्वत्र दिसायला लागतात. पावसाचे पाणी कुठे साचू नये, कुठे ओल राहू नये यासाठी लोकांची धडपड चालू होते. अशा वेळी आम्ही तुम्हाला अशा एका देशाची माहिती देणार आहोत, जिथे एकही डास नाही. जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेला आइसलँड हा देश शब्दशः डासमुक्त देश आहे. इथे शोधूनदेखील एकही डास सापडत नाही. आइसलॅंडव्यतिरिक्त अंटार्क्टिका खंडातदेखील डास आढळून येत नाहीत. यामागे काही मनोरंजक अशी वैज्ञानिक कारणे आहेत. आईसलॅंडचे तापमान वर्षभर नीचांकी अवस्थेत असते. हिवाळ्यात तर ते -38 पर्यंत पोहोचते. या अशा थंड हवेमुळे पाणी झटकन गोठते आणि डासांच्या मादी आणि पुप्या जगू शकत नाहीत. असे हवामान त्यांचे प्रजनन चक्र पूर्णपणे विस्कळीत करून टाकते. आइसलॅंडचे हवामान खूप लवकर बदलतदेखील असते. तापमानात होणारा असा झटकन बदल डास सहन करू शकत नाहीत. डासांच्या जीवनचक्राला खीळ बसते. काही संशोधकांच्या मते आइसलॅंडवरचे पाणी, तेथील माती आणि एकूण पर्यावरणाची रचना ही डासांच्या प्रजननासाठी अनुकूल नाही. मुख्य म्हणजे डासांना अंडी घालण्यासाठी साठलेल्या पाण्याची गरज असते. मात्र इथले पाण्याचे साठे एकतर प्रवाही आहेत आणि ते थंड हवामानामुळे झटकन गोठतात. डासांना त्यामुळे अंडी घालणे अशक्य बनते. विशेष म्हणजे आइसलॅंडमध्ये डासांच्या सोबतीने साप आणि इतर सरपटणाऱ्या प्राण्यांच्या प्रजातीदेखील फारशा आढळत नाहीत. मात्र काही प्रमाणात कोळी आणि इतर काही कीटकांच्या प्रजाती इथे आढळतात. अत्यंत थंड आणि डासांसारख्या प्रजातींसाठी प्रतिकूल असणारे इथले वातावरण इतर काही कीटकांसाठी अनुकूल कसे बनते हा संशोधकांच्या अभ्यासाचा विषय बनलेला आहे.