वेब न्यूज – ‘वनवेब’ हिंदुस्थानी जमिनीवरून सॅटेलाईट लाँच करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी अंतराळ आणि सॅटेलाईट कंपन्यांची संघटना असलेल्या ‘इंडियन स्पेस असोशिएशन’चा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमात भारती एंटरप्रायझेसच्या सुनील मित्तल यांच्याकडून एक अनोखी घोषणा करण्यात आली. ‘वनवेब’ ही भारती एंटरप्रायझेसचा एक भाग असलेली कंपनी लवकरच हिंदुस्थानच्या जमिनीवरून स्वतःचे सॅटेलाईट अवकाशात सोडणार आहे. असे कार्य पार पाडणारी ती पहिलीच खासगी कंपनी असणार आहे. हिंदुस्थानी अवकाश संशोधन संस्था ‘इस्रो’च्या मदतीने हे सॅटेलाईट सोडले जाणार आहे. यासाठी इस्रोच्या ‘जियोसिंक्रोनस सॅटेलाईट लाँच व्हेइकल मार्क-3’ या रॉकेटचा उपयोग केला जाणार आहे. 2022 सालापर्यंत या सॅटेलाईटच्या मदतीने देशभरात कनेक्टिव्हिटी देण्याचा निर्धार या वेळी सुनील मित्तल यांनी व्यक्त केला. दुसरीकडे सरकारने याच अनुषंगाने सध्या जगातील प्रमुख देश ज्या ‘6जी’ नेटवर्कच्या चाचण्या घेत आहेत, त्या क्षेत्रात उतरत जगातील प्रमुख नेटवर्क पंपन्यांना टक्कर देण्याचे ठरवले आहे. सरकारतर्फे लवकरच ‘6जी’ नेटवर्कसाठीच्या चाचण्यांना सुरुवात करण्यात येत आहे. दूरसंचार विभागाने या चाचण्यांचे काम सरकारी टेलिकॉम रिसर्च कंपनी ’सी-डॉट’ वर सोपवली आहे. या चाचण्यासंदर्भातील सर्व गोष्टींचा आढावा घेण्याचे सूचना ’सी-डॉट’ला करण्यात आली आहे.

हुवेई, सॅमसंग, एलजीसारख्या जगप्रसिद्ध कंपन्यांनी पूर्वीच ’6जी’ तंत्रज्ञानावर काम करण्यास आणि त्याच्या चाचण्या घेण्यासदेखील सुरुवात केली आहे. आधुनिक ’6जी’ तंत्रज्ञान हे ’5जी’ तंत्रज्ञानापेक्षादेखील 50 पट अधिक वेगवान असणार आहे. एका अंदाजानुसार 2028 ते 2030 सालापर्यंत हे तंत्रज्ञान बाजारात उपलब्ध होणार आहे. हिंदुस्थानात मात्र अजूनही ’5जी’ नेटवर्कच्याच चाचण्या सुरू असून, या तंत्रज्ञानाची सुरुवातदेखील व्हायची आहे.