
सोशल मीडियाचे जेवढे गुण आहेत अगदी तेवढेच अवगुणदेखील आहेत. एखादे चांगले तंत्रज्ञान समाजपंटकांच्या हाताला लागले की, ते त्याचा कसा दुरुपयोग करतात याचे गंभीर उदाहरण म्हणजे सोशल मीडिया होय. एका बाजूल छोटे व्यापारी आपल्या व्यवसायासाठी, विद्यार्थी ज्ञानार्जनासाठी, तरुण नोकरीच्या संधी शोधण्यासाठी, कुणी आपले जुने सवंगडी गोळा करण्यासाठी करत असताना, दुसऱया बाजूला काही समाजविघातक शक्ती याच व्यासपीठाचा उपयोग अफवा पसरवणे, धार्मिक द्वेष वाढवणे, खोटय़ा बातम्या चर्चेत आणणे अशा दुष्पृत्यांसाठी करत असतात. अशा अफवामुळे, खोटय़ा बातम्यांमुळे सामाजिक तेढ निर्माण होण्याच्या, दंगली पसरण्याच्या घटना सातत्याने वाढू लागल्या आहेत. जगभरातील देशांनी याची दखल घेत याविरुद्ध काही खास कायदे आणि उपाय राबवायला सुरुवातदेखील केली आहे. सोशल माध्यमेदेखील सर्व तयारीनिशी या लढय़ात उतरली आहेत. सध्या सर्वात जास्त चिंतेचा विषय आहे, तो म्हणजे सोशल मीडियाद्वारे पसरणाऱया खोटय़ा बातम्या. आता ‘ट्विटर’सारख्या लोकप्रिय माध्यमाने अशा खोटय़ा बातम्यांविरुद्ध लढण्यासाठी तीन खास उपाय विकसित करण्याचे ठरवले आहे. त्यामध्ये पहिल्या पातळीवरती यूजरला ‘Get the Latest, Stay Informed आणि Misleading’ अशा तीन चाचण्यांच्या मदतीने कोणत्याही बातमीची सत्यता लगेचच तपासून बघता येणार आहे. पहिल्या चाचणीत म्हणजे ‘Get the Latest’ मध्ये विशिष्ट विषयावरची अद्ययावत माहिती ताबडतोब मिळवता येईल, तसेच या माहितीचा पाठपुरावादेखील करता येईल. ‘Stay Informed’ मध्ये यूजरला तो ज्या विषयावरची बातमी तपासत आहे, त्या विषयावरील विस्तृत माहिती पुरवण्यात येईल आणि तिसऱया पातळीवरती, म्हणजे ‘Misleading’ मध्ये यूजरला खोटय़ा बातम्या आणि दिशाभूल करणाऱया ट्विट्सच्या संदर्भात सावध करण्यात येईल. यासाठी ट्विटरला मोठय़ा प्रमाणावरती डाटाबेस तयार करायला लागणार असून, दिशाभूल करणारे ट्विट्स आणि खोटय़ा बातम्या ओळखू शकणारा एक अल्गोरिदमदेखील तयार करावा लागणार आहे. सध्या या तिन्ही उपायांच्या चाचण्या चालू असून, लवकरच ते सर्वांसाठी उपलब्ध होतील.































































