
चंद्राच्या पृष्ठभागावरती पाण्याचे पुरावे सापडल्याची अधिकृत घोषणा अहेर नासातर्फे करण्यात आली आहे. गेला बराच काळ चंद्रावरती पाणी असल्याचे अंदाज बांधले जात होते, मात्र हे पाणी चंद्राचा जो भाग अंधारात आहे तिथे असल्याचा अंदाज लावला जात होता. मात्र आता चंद्राच्या ज्या भागावरती सूर्याचा थेट प्रकाश पडतो तिथे पाण्याचे अणू सापडल्याची अधिकृत बातमी नासाने दिली आहे. यासंदर्भात सायन्स जनरल ‘नेचरऍस्ट्रोनॉमी’ या मासिकात दोन वेगवेगळे शोधनिबंध सादर करण्यात आले आहेत. चंद्रावरती पाणी सापडल्याने चंद्रावरती तळ उभारण्याच्या नासाच्या योजनेला अधिक बळ मिळणार आहे. चंद्रावरती मिळणाऱया इतर नैसर्गिक साधनांचा वापर करूनच हा तळ उभारण्याचा नासाचा मानस आहे. या पुढील चांद्रमोहिमांमध्येदेखील या नैसर्गिक साधनांचा कितपत उपयोग होईल याबद्दलदेखील संशोधन आता हाती घेतले जाणार आहे. या वेळी केलेल्या संशोधनात हे स्पष्ट झाले आहे की, शास्त्र्ाज्ञांनी जो अंदाज बांधला होता त्यापेक्षा जास्त पाणी चंद्रावरती उपलब्ध आहे. चंद्रावरती कुठे कुठे पाणी उपलब्ध असेल त्या त्या पृष्ठभागाचा अंदाज घेऊन मगच चंद्रावरती तळ कुठे उभा करायचा याचा निर्णय घेतला जाणार आहे. नासाच्या योजनेनुसार 2024 पर्यंत जगातील पहिली महिला अवकाशयात्री आणि तिच्या जोडीला एक पुरुष अवकाशयात्री यांना चंद्रावरती उतरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 2030 साली ‘पुढचे मोठे पाऊल’ या मोहिमेखाली मंगळावरती मानवाला उतरवण्याची तयारी नासाने सुरू केली आहे. 2024 च्या चांद्रमोहिमेकडे तिचाच एक भाग म्हणून पाहिले जात आहे. यासाठी चंद्रावरती कायमस्वरूपी तळ बनवणे महत्त्वाचे आहे. कारण त्याच्या मदतीनेच चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशात येणाऱया काळात काही शोधमोहिमा आखण्याची तयारी नासाने केली आहे. हा तळ बनवण्यात यश आल्यास पृथ्वीवरून चंद्रावरती थेट रॉकेट पाठवण्यापेक्षा चंद्रावरतीच रॉकेट इंधन बनवणे अधिक सोपे आणि स्वस्त असणार आहे.































































