
सामना ऑनलाईन । मेरठ
लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे म्हटले जाते. याची प्रचिती देणारा विवाह सोहळा उत्तर प्रदेशातल्या मेरठमध्ये पार पडला. दोन फूट उंचीचा नवरा आणि त्यापेक्षा इंचभर उंच असलेली वधू असा बालविवाहाप्रमाणे वाटणारा एक विवाह सोहळा उत्तर प्रदेशात सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
मुजफ्फर नगरच्या चैतला गावात राहणारा अब्दुल कलाम याचे वय 24 वर्षं आहे, मात्र उंची फक्त दोन फूट. उंची कमी असल्याने अब्दुलला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे भविष्यात आपले लग्न कसे होणार याची चिंता त्याला नेहमी भेडसावत होती. काही दिवसांपूर्वी त्याच्या नातेवाईकांच्या परिचयाने तरन्नुमची ओळख झाली आणि त्यांच्या लग्नगाठी जुळल्या. तरन्नुम आणि अब्दूलची एकमेकांना अगदी साजेशी जोडी जुळल्याने त्यांच्या पालकांनाही हायसे वाटले. तरन्नुमची उंची अब्दुलपेक्षा फक्त एका इंचाने जास्त आहे. गेल्या आठवड्यात शामली येथे मुस्लीम रीतीरिवाजानुसार दोघांचा विवाह पार पडला. या अनोख्या विवाह सोहळ्यामुळे वर-वधू आणि त्यांच्या कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
























































