पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । झारग्राम, बंगाल

पश्चिम बंगालमध्ये निवडणुका आणि हिंसाचार असं समीकरणंच आहे. याचा प्रत्यय रविवारी लोकसभा निवडणूकांच्या सहाव्या टप्प्यातील मतदानावेळीही जनतेला आला. येथे 8 जागांसाठी मतदान आहे. पण मतदान सुरू होण्याआधीच झारग्राममध्ये भाजपच्या व तृणमूलच्या दोन कार्यकर्त्यांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. रामेन सिंह असे भाजप कार्यकर्त्याचे नाव आहे. तर दुसरीकडे मिदनापूर येथे तृणमूलच्या दोन कार्यकर्त्यांवर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. त्यांना तमलुक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर बेल्दा येथे अज्ञातांनी तृणमूलच्या कार्यालयावर हल्ला केला. हा हल्ला भाजपनेच केल्याचा आरोप तृणमूलने केला आहे.

बंगालच्या बहुचर्चित माजी आयपीएस अधिकारी आणि घाटल मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार भारती घोष यांनी केशपूर येथे तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. तर रामेन सिंह याच्या हत्येसाठी भाजपने तृणमूलला जबाबदार ठरवले आहे. दरम्यान स्थानिक पोलिसांनी यास नकार दिला आहे. रामेन सिंह आधीपासूनच आजारी होते. त्यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच त्यांच्या मृत्यूचे कारण कळेल असे त्यांनी म्हटले आहे.

झारग्राममध्ये एका भाजप कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. तर मरधारा येथील कांठामध्ये तृणमूलच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. सुधाकर मैती असे त्याचे नाव असून रविवारी रात्रीपासूनच तो बेपत्ता होता. पण नंतर त्याचा मृतदेह सापडला. रात्री नातेवाईकाला भेटण्यासाठी म्हणून ते घराबाहेर पडले होते. दरम्यान ही हत्या कोणी व का केली असावी याबद्दल चौकशी सुरू आहे.

लोकसभेच्या प्रत्येक टप्प्यावेळी बंगालमध्ये हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. पण एवढे जरी असले तरी मतदानाचा टक्का मात्र वाढला आहे. यावेळी भाजप पूर्ण जोर लावत बंगालमध्ये निवडणूक लढत असून ही थेट लढत तृणमूल व भाजपमध्ये आहे. यामुळे दोन्ही पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपने धार्मिक वातावरण दूषित केल्याचा आरोप तृणमूल करत आहे . लोकसभेच्या सहाव्या टप्प्यासाठी तामलुक, कांति, घाटल,झारग्राम, मेदिनीपूर, पूर्णिया, बांकुरा, विष्णूपूर येथे मतदान होत आहे.