विरोधकांची एकजूट अटळ, आता जनताच सर्व पक्षांना एकत्र यायला भाग पाडेल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता देशभरातील विरोधक एकत्र येणे, त्यांची एकजूट होणे ही अटळ अशी नैसर्गिक बाब आहे आणि ती होणारच आहे. जरी विरोधक एकत्र आले नाही तरी देशातील जनताच सर्व विरोधी पक्षांना एकत्र यायला भाग पाडणार आहे, असा विश्वास पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला.

देशात 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, देशभरातील विरोधक पुन्हा एकत्र येणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता त्यांनी विरोधक एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले. सर्व विरोधक एकत्र आले तर त्यांचे नेतृत्व कोण करणार, या खोचक प्रश्नांवर कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता हा आमचे नेतृत्व करणार नाही तर या देशाची जनताच सर्व विरोधकांचे नेतृत्व करणार असल्याचे ममता यांनी सांगितले.

ममता बॅनर्जी यांनी घेतली मोदींची भेट

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाची धूळ चारल्यानंतर आज पहिल्यांदा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राजकीय शिष्टाचारानुसार ही सदिच्छा भेट होती. या भेटीत पॅगसस किंवा अन्य कोणत्याही विषयावर चर्चा झाली नाही, असे स्पष्ट करत पश्चिम बंगालला पुरेसा लससाठा पुरवण्याची विनंती आपण पंतप्रधान मोदी यांना केली असल्याचे ममता यांनी पत्रकारांना सांगितले.

आज सोनियांची भेट, संसद अधिवेशनानंतर पवारांना भेटणार

पंतप्रधान मोदींची भेट घेण्यापूर्वी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांची भेट घेतली. दोघांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. त्यानंतर ममतांनी काँग्रेसचेच ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांच्याशीही बातचीत केली. दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मला उद्या, 28 जुलैला चहापाणासाठी बोलावले आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची संसद अधिवेशनानंतर भेट घेणार असल्याचे ममता यांनी सांगितले.