पश्चिम बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार; भाजपची ‘विजय यात्रा’ रोखल्याने तणाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बुनियादपूर

पश्चिम बंदालमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला आहे. दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यात भाजपची ‘विजय यात्रा’ रोखल्याने भाजप कार्यकर्ते पोलिसांशी भिडले आहेत. मेदिनीपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या खासदार दिलीप घोष यांच्या विजय यात्रेदरम्यान ही घटना घडली आहे. घोष यांनी पूर्वपरवानगीशिवाय यात्रा काढल्याचे सांगत पोलिसांनी यात्रेला विरोध केला. त्यानंतर वाद- विवाद वाढला आणि कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये हाणामारी झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

पश्चिम बंगालमध्ये राजकीय विजय यात्रा आणि राजकीय रॅलींवर बंदी घालण्यात आली आहे. बंदी असताना तसेच कोणतीही पूर्वपरवानगी घेतली नसल्याने पोलिसांनी विजय यात्रा रोखण्याचा प्रयत्न केला. भाजपला विजय यात्रा काढण्यासाठी परवानगी देण्यात येणार नाही, असे ममता बॅनर्जी यांनी गुरुवारीच स्पष्ट केले होते. पोलिसांनी यात्रा रोखल्याने संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांना अडवत यात्रा पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तणाव वाढला. कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करत कार्यकर्त्यांवर लाठीहल्ला केला. त्यामुळे कार्यकर्ते चवताळले आणि त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. या हाणामारीत काही पोलीस आणि काही कार्यकर्ते जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तृणमूल काँग्रेसचा गड समजल्या जाणाऱ्या मेदिनीपूरमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपच्या दिलीप घोष यांनी तृणमूल काँग्रेसच्या मानस भूनिया यांचा पराभव केला आहे. त्यामुळे या विजयासाठी ही यात्रा काढण्यात आली होती.

मतदारांनी आम्हाला दिलेल्या पाठिंब्यासाठी त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी ही यात्रा आयोजित केली होती. मात्र, पोलीस आम्हाला जनतेची भेट घेऊ देत नाहीत. काही ठिकाणी मुद्दाम संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तृणमूलचे कार्यकर्ते आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ले करत आहेत, असे दिलीप घोष यांनी सांगितले. विजय यात्रेच्या नावाखाली भाजप हुगळी, बांकुरा, पुरुलिया आणि मिदनापूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण करत आहे. त्यामुळे आता राज्यात विजय यात्रांना परवानगी देण्यात येणार नाही, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी जाहीर केले होते. तरीही ही विजय यात्रा काढण्यात आल्याने पोलिसांना कारवाई करावी लागली असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.