कोणाला फायदा पोहोचवण्याचा प्रयत्न? 8 टप्प्यातील मतदानावर ममतादीदींचा खडा सवाल

mamata-benargee

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी आज पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा घोषणा केली. पश्चिम बंगालमध्ये 294 जागांसाठी आठ टप्प्यात मतदान पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकांची घोषणा केल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यावर आक्षेप घेत निवडणूक आयोगाला बोचरा सवाल केला आहे.

आसामसह काही राज्यांमध्ये एका टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. परंतु पश्चिम बंगालमध्ये मात्र आठ टप्प्यात मतदान होणार आहे, असे का? कोणाला फायदा पोहोचवण्याचा प्रयत्न आहे? असा सवाल ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाला विचारला आहे. भारतीय जनता पक्षाने ज्या मागण्या केल्या होत्या त्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. एका जिल्ह्यातही तीन-तीन टप्प्यात मतदान होणार आहे. यामागे काय उद्देश आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना पश्चिम बंगालला येण्यापूर्वी आसाम आणि तमिळनाडूतील निवडणूक प्रचार करता यावा यासाठी असे करण्यात आले का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

त्या पुढे म्हणाल्या की, काहीही झाले तरी आम्ही भाजपचे मनसुबे यशस्वी होऊ देणार नाही. आम्ही त्यांना संपवून टाकू. हिंदू आणि मुसलमानांचे ध्रुविकरण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सध्या खेळ सुरू असून आम्हीच जिंकू, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या. तसेच भाजप देशात फूट पाडत असून बंगालमध्ये असेच काहीतरी करण्याचा त्यांचा मनसुबा आहे, असेही त्या म्हणाल्या. तसेच निवडणूक आयोगाने पैशांचा गैरव्यवहाराकडे लक्ष द्यावे, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.

आठ टप्प्यात मतदान

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये 294 जागांसाठी आठ टप्प्यात मतदान पार पडणार आहे. पहिला टप्पा – 27 मार्च
दुसरा टप्पा – 1 एप्रिल, तिसरा टप्पा – 6 एप्रिल, चौथा टप्पा – 10 एप्रिल
पाचवा टप्पा – 17 एप्रिल, सहावा टप्पा – 22 एप्रिल, सातवा टप्पा – 26 एप्रिल आणि अंतिम टप्पा – 29 एप्रिल

1 लाख मतदान केंद्र

पश्चिम बंगालमध्ये 1 लाखांहून अधिक मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणारी ही निवडणूक आव्हानात्मक असणार आहे, असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा म्हणाले. तसेच मतदानासाठी एक तास अधिकचा देण्यात येईल आणि 2 मे रोजी मतमोजणी होईल, असेही ते म्हणाले.

तीन राज्यात एकाच टप्प्यात मतदान

दरम्यान, तमिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तमिळनाडूत 234 जागांसाठी 6 एप्रिलला, केरळमध्ये 140 जागांसाठी 6 एप्रिलला आणि पुद्दुचेरीमध्ये 30 जागांसाठी 6 एप्रिलला मतदान होईल.

आपली प्रतिक्रिया द्या