बंगाल निवडणुकीचे वातावरण तापले! रथ आणि व्हीलचेअर आमने-सामने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. व्हीलचेअरवरून प्रचाराचा धडाका लावणाऱया तृणमूल काँग्रेस नेत्या ममता बॅनर्जींविरोधात मंगळवारी भाजप नेते अमित शहा यांनी रथामध्ये उभे राहून रोड शो काढला. ममतादीदींनी भाजपला राजकारणातून गाडण्याचे आवाहन मतदारांना केले, तर शहांनी बंगालच्या परिवर्तनासाठी ममतांना पराभूत करण्याचे आवाहन केले.

दुसऱया टप्प्यातील मतदानासाठी प्रचाराचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. तृणमूल काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी नंदिग्रामची निवडणूक प्रतिष्ठsची केली आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळपासून दोन्ही पक्षांनी प्रचारात परस्परांविरोधात दंड थोपटले होते. एकीकडे शहांनी भाजप उमेदवार सुवेंदू अधिकारी यांच्यासोबतीने रथात उभे राहून रोड शो काढला, तर दुसरीकडे ममता बॅनर्जींनी भागाबेडामध्ये व्हीलचेअरवर बसून पदयात्रा काढली. पदयात्रा सुरू होण्याआधी त्यांच्या गाडय़ांचा ताफा शहांचा रोड शो असलेल्या रस्त्यावरून गेला, त्यावेळी तेथील जमावातून ‘जय श्रीराम’चे नारे देण्यात आले.

काय म्हणाल्या ममतादीदी?

“मी नंदिग्राममधून उभी आहे, कारण मला येथील भाऊ-बहिणी आणि मातांचा आशीर्वाद पाहिजे. भाजप मतांसाठी पैसे देईल ते घ्या; कारण हे भाजपने चोरलेले आपलेच पैसे आहेत. पुढचे 48 तास डोके शांत ठेवा आणि तृणमूल काँग्रेसला मतदान करा. भाजप बाहेरच्या गुंडांच्या मदतीने हिंसा घडवतोय. आपल्याच पक्षातील महिलेची हत्या करतात व त्याचे खापर बंगालवर फोडतात. भाजपला राजकारणातून गाडा व नंदिग्राम-बंगालमधून पिटाळून लावा.’’

काय म्हणाले अमित शहा?

“संपूर्ण बंगालमध्ये परिवर्तन करण्याचा साधा सरळ मार्ग म्हणजे नंदिग्राममधून ममतांना हरवा. बंगालच्या जनतेला परिवर्तन हवेय. आम्ही बंगालमध्ये 200 हून अधिक जागा जिंकू. ममतादीदी कशाच्या आधारे महिला सुरक्षेच्या गोष्टी करताहेत? त्यांनी नंदिग्राममध्ये ज्या ठिकाणी मुक्काम केला आहे त्याच घरापासून 5 किलोमीटर अंतरावर महिलेवर बलात्काराची घटना घडलीय. मग बंगालच्या सुरक्षेचे काय?’’