विराट पराक्रम! दुसऱ्या वनडेत कर्णधार कोहलीचे विक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, पोर्ट ऑफ स्पेन

कर्णधार विराट कोहलीने रविवारी झालेल्या दुसऱ्या वन-डेत 120 धावांची खेळी साकारत टीम इंडियाला वेस्ट इंडीजवर 59 धावांनी डकवर्थ लुईस नियमानुसार विजय मिळवून दिला. या विजयामुळे हिंदुस्थानला तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेता आली. शतकी खेळी साकारताना विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय स्तरावर काही विक्रमांवर मोहोर उमटवली.

65 धावांवर पोहोचताच थकलो होतो – कोहली

क्वीन्स पार्क ओव्हलवरील वातावरण खेळाडूंसाठी आव्हानात्मक होते. 65 धावा झाल्यानंतर मीही थकलो होतो, पण पहिल्या तीन फलंदाजांपैकी एकाने तरी डाव सांभाळण्याची जबाबदारी उचलायला हवी. रोहित शर्मा व शिखर धवन यांनी याआधी ही जबाबदारी इमानेइतबारे पार पाडली आहे. या लढतीत ते झटपट बाद झाले. त्यामुळे मला ही भूमिका पार पाडावी लागली असे लढतीनंतर विराट कोहली म्हणाला.

त्याला शतकाची गरज होती – भुवनेश्वर

दुसऱ्या वन-डेत प्रभावी गोलंदाजी करीत टीम इंडियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या भुवनेश्वर कुमारने विराट कोहलीच्या खेळीचे कौतुक केले. यावेळी तो म्हणाला, विराट कोहलीला शतकाची नितांत गरज होती. तो सुमार फॉर्ममधून जात आहे. यासाठी त्याला शतकाची गरज नव्हती. मात्र गेल्या काही डावांमध्ये तो 70 ते 80 धावा करतोय. यादरम्यान त्याच्याकडून शतक काही होत नव्हते. मोठी खेळी करण्यात तो तरबेज आहे. यासाठी शतक त्याच्यासाठी महत्त्वाचे होते, असे भुवनेश्वर कुमार पुढे म्हणाला.

या आकडय़ांवर एक नजर

विराट कोहलीने वेस्ट इंडीजविरुद्ध आठवे वन-डे शतक झळकावले. याआधी त्याने ऑस्ट्रेलिया व श्रीलंका यांच्याविरुद्ध प्रत्येकी आठ शतके झळकावली आहेत. तीन देशांविरुद्ध आठ किंवा त्यापेक्षा जास्त शतके झळकावणारा तो आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिलाच फलंदाज ठरलाय. सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नऊ आणि श्रीलंकेविरुद्ध आठ शतके झळकावली आहेत.

विराट कोहलीने वेस्ट इंडीजविरुद्ध 72.57च्या सरासरीने धावा फटकावल्या आहेत. वेस्ट इंडीजविरुद्धची ही सर्वोत्तम सरासरी ठरलीय. वेस्ट इंडीजविरुद्धच्या गेल्या आठ सामन्यांमध्ये त्याने पाच शतके झळकावली आहेत.

विराट कोहलीने दुसऱ्या वन-डेत दमदार शतक झळकावताना सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत आठव्या स्थानावरही धडक मारलीय. विराट कोहलीने आतापर्यंत 238 सामन्यांमध्ये 11406 धावा तडकावल्या आहेत.

विराट कोहलीने 11 डावांनंतर शतक साजरे केले आहे. वर्ल्डकपमधील नऊ लढतींत त्याला एकही शतक झळकवता आलेले नाही. याआधी 2015 साली सलग 13 डावांमध्ये त्याला शतक झळकावता आले नव्हते.