पश्चिम महाराष्ट्रातील नगरपंचायतींचा आज फैसला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिह्यातील सहा नगरपरिषदांमधील उर्वरित 23 जागांसाठी मंगळवारी शांततेत 80.49 टक्के मतदान झाले. जिल्ह्यात सर्वाधिक 85.03 टक्के मतदान दहिवडीत, तर सर्वात कमी 76.48 टक्के मतदान पाटण येथे झाले. या सर्व नगरपंचायतींमधील मतमोजणीकडे संपूर्ण जिह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मंगळवारीच्या टप्प्यातील दहिवडीतील एक जागा बिनविरोध झाली असून, ती शिवसेनेने जिंकली आहे.

जिह्यातील लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा तसेच दहिवडी अशा सहा नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मागील महिन्यात 21 डिसेंबरला मतदान झाले होते. त्यावेळी एकूण 75.27 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या सर्व नगरपंचायतींमध्ये प्रत्येकी 17 जागा असून, ओबीसी आरक्षणाच्या निर्माण झालेल्या तिढय़ामुळे प्रत्येक नगरपंचायतीतील प्रत्येकी 4 जागांची निवडणूक खोळंबली होती. बिनविरोध झालेली दहिवडीची 1 जागा वगळता एकूण 23 जागांसाठी मंगळवारी शांततेत मतदान झाले.

लोणंद नगरपंचायतीसाठी 79.25, कोरेगावसाठी 79.79, पाटणसाठी 76.48, वडूजसाठी 80.86, खंडाळय़ासाठी 84.89, तर दहिवडी नगरपंचायतीसाठी 85.03 टक्के मतदान झाले. यामध्ये 7056 पुरुष, तर 6762 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.