पुलाच्या कामासाठी पश्चिम रेल्वेवर आज मध्यरात्रीपासून 14 तासांचा ब्लॉक, रविवारच्या अनेक लोकल रद्द होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम रेल्वेकडून जोगेश्वरी ते गोरेगाव स्थानकांदरम्यान पुलाचा गर्डर टाकण्यासाठी शनिवारी मध्यरात्री 12 ते रविवारी दुपारी 2 वाजेपर्यंत 14 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक पश्चिम रेल्वेच्या अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर आणि हार्बरच्याही अप-डाऊन हार्बर मार्गावर असणार आहे. त्यामुळे रविवारच्या अनेक लोकल सेवा रद्द असणार आहे.

ब्लॉकच्या परिणाम मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनस येथून सुटणाऱया मेल- एक्प्रेसच्या गाडय़ांवरही होणार आहे. अंधेरी आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील सर्व लोकल गाडय़ा जलद मार्गावर चालवल्या जाणार आहेत. याशिवाय मध्य रेल्वेवरून धावणाऱया सर्व हार्बर मार्गावरील सेवा वांद्रे स्थानकापर्यंत चालविण्यात येणार आहेत.

या लोकल सेवा रद्द
– ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील दुपारी 1.52 वाजताची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-गोरेगाव लोकल, सकाळी 10.37 वाजताची पनवेल-गोरेगाव लोकल, दुपारी 12.53 ची गोरेगाव-सीएसएमटी लोकल, दुपारी. 12.14 ची गोरेगाव-पनवेल लोकल रद्द असणार आहे.

-बोरिवलीहून दुपारी 1.14 आणि 3.40 वाजताची बोरिवली-चर्चगेट लोकल रद्द असणार आहे. त्याऐवजी दोन अतिरिक्त जलद लोकल विरारहून चर्चगेटसाठी दुपारी 1.45 आणि दुपारी 4.15 वाजता सोडण्यात येणार आहेत.