पश्चिम रेल्वेच्या धिम्या मार्गावरही एसी लोकल

पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात सात एसी लोकल आल्या असल्या तरी अद्याप पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या दिवसभरात केवळ 12 फेऱया होत आहेत. या एसी लोकलला हळूहळू प्रतिसाद मिळत असून सध्या जलद मार्गावर धावणारी एसी लोकल लवकरच धिम्या मार्गावरही चालवून तिचे प्रवासी वाढविण्याची पश्चिम रेल्वेची योजना असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कन्सल यांनी दिली आहे.

पश्चिम रेल्वेवर चार वर्षांपूर्वी 25 डिसेंबर 2017 रोजी वातानुकूलित लोकलचे उद्घाटन झाले. या लोकलच्या विरार ते चर्चगेटदरम्यान दररोज 12 फेऱया होत असून तिला अजून हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे म्हटले जात आहे. या लोकलच्या मोजक्याच फेऱया असल्याने एखादी गाडी चुकली तर महागडे तिकीट काढणाऱयांची साध्या बिगर एसी लोकलमधून प्रवास करण्याची मानसिकता नसते असेही म्हटले जाते.

त्यासाठी एसी लोकलच्या फेऱया वाढविण्याची गरज आहे, परंतु फेऱया वाढविल्याने साध्या फेऱया कमी होण्याचीही भीती आहे. एसी लोकलचे प्रवासी वाढविण्यासाठी रेल्वे बोर्डाकडून अर्धे डबे एसीचे आणि अर्धे डबे साधे अशी ‘मिक्स लोकल’ चालविण्याच्या योजनेवरही अभ्यास सुरू आहे. सध्या पश्चिम रेल्वेची एसी लोकल जलद थांब्यावरच थांबा घेत असल्याने तिला धिम्या मार्गावरही चालविण्याची योजना असल्याचे पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक कन्सल यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या