तुम्हाला अतिरिक्त एसी लोकल हवी काय? पश्चिम रेल्वेचा प्रवाशांसाठी ऑनलाइन सर्व्हे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रवाशांना एसी लोकल हवी की नको ? यासाठी आता सर्वेक्षण करण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेने याबाबत प्रवाशांकडून इंटरनेटवर ई-मेलद्वारे अभिप्राय मागविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना साध्या लोकलच्या बदल्यात एसी लोकल चालेल का? बोरिवली आणि विरारवरून त्यांना चर्चगेटसाठी नेमक्या कोणत्या वेळेत एसी लोकल हवी अशी प्रश्नावली प्रवाशांना देण्यात येणार आहे. त्यानंतर एसी लोकलबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वेवर देशातील पहिली वातानुकूलित उपनगरीय लोकल 25 डिसेंबर 2017 रोजी सुरू करण्यात आली. आता पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांच्या सवयीच्या झालेल्या या एसी लोकलच्या दिवसाला बारा फेऱया होत असून तिला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, तरीही एसी लोकलच्या प्रवाशांना तिचे फारसे आकर्षण राहिले नसल्याचे उघड झाले आहे. प्रवासी आपल्या नेहमीच्या कमी तिकीट दराच्या साध्या लोकलना सोडण्यास तयार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर आयसीएफच्या कारखान्यातून पाच ते सहा नव्या एसी लोकल आल्या तरीही पश्चिम रेल्वे तिच्या फेऱयांचा वेळापत्रकात समावेश करण्यास कचरत आहे. त्यामुळे आता पश्चिम रेल्वेने एसी लोकलबाबत प्रवाशांच्या प्रतिक्रिया घेण्यास सुरुवात केली आहे. यासाठी पश्चिम रेल्वेने प्रश्नावली तयार केली असून त्यात विविध प्रश्नाना उत्तरे लिहून प्रवाशांनी पाठवायची आहेत.

अतिरिक्त एसी लोकलसाठी प्रवाशांना विचारलेले प्रश्न खालीलप्रमाणे –

1) प्रवासी म्हणून तुम्ही एसी लोकलने प्रवास करण्यास प्राधान्य देता?
पर्याय – हो अथवा नाही

2) एसी लोकल जर सामान्य लोकलच्या वेळेत चालविली तर चालेल का?
पर्याय – हो अथवा नाही

3) विरार -बोरिवली ते चर्चगेटसाठी कोणत्या ‘टाइमस्लॉट’मध्ये एसी लोकल हवी?
पर्याय –

6.00 ते 7.00
7.00 ते 8.00
8.00 ते 9.00
9.00 ते 10.00
10.00 ते 11.००

4) तुम्हाला चर्चगेट ते बोरिवली-विरारसाठी कोणती एसी लोकल चालेल?
पर्याय –

17.00 ते 18.00
18.00 ते 19.00
19.00 ते 20.00
20.00 ते 21.00
21.00 ते 22.00

5) एसी लोकलच्या भाडे रचनेत तुम्हाला बदल हवा आहे का?
पर्याय-

सध्याचे भाडे रचना ठीक आहे.
भाडे वाढविण्याची गरज आहे.
भाडे कमी करण्याची गरज आहे.